Rani Mukerji Aditya Chopra Secret Italy Wedding: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जीने २०१४ मध्ये चित्रपट निर्माते आदित्य चोप्राबरोबर लग्न केले. जबरदस्त चाहतावर्ग असलेल्या राणीच्या लग्नाला अवघे १३ लोक उपस्थित होते. इटलीमध्ये झालेल्या या लग्नामध्ये फक्त कुटुंबातील लोक उपस्थित होते. राणी व आदित्य यांचे नातेसुद्धा अनेक वर्षे माध्यमांपासून लपून होते, अजूनही त्यांच्या लग्नाचा एकही फोटो समोर आलेला नाही. सब्यसाची मुखर्जी यांनी राणी मुखर्जींचा लग्नाचा किस्सा शेअर केला आहे.
राणी-आदित्य यांच्या या गुप्त लग्नाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, राणी ही डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांची पहिली डिझानर वधू होती. नुकतेच सब्यसाची यांनी राणीच्या लग्नातील लेहेंग्याबद्दलचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “जेव्हा तिने १५ लोकांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केलं, तेव्हा फक्त १३ लोकांना परवानगी होती आणि आदित्य हा ड्रोनचा पाठलाग करत होता. हे ऐकून राणीला हसू आवरत नव्हते. राणीने मला लग्नाचा लेहेंगा तयार करण्यासाठी फक्त एक आठवड्याचा वेळ दिला होता.”
राणी माझ्या कुटुंबातील एक – सब्यसाची
पुढे सब्यसाची म्हणाले, “मी बॉलीवूडसाठी कस्टमाइज कपडे तयार करत नाही. पण, तिच्यासाठी मी कस्टम साडी तयार केली. कारण माझ्यासाठी राणी ही कुटुंबातील एक आहे.” विशेष म्हणजे २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली २’ या चित्रपटासाठीही सब्यसाची यांनी राणीची स्टायलिंग केली होती.


करण जोहरला दिलेली ताकीद
राणी आणि आदित्य यांच्या लग्नाला दिग्दर्शक करण जोहरही उपस्थित होता. लग्नाची माहिती बाहेर जाऊ नये याची जबाबदारी आदित्यने करणवर सोपवली होती. आदित्य चोप्रा म्हणाले, “लग्नाची माहिती जर बाहेर कळाली तर त्याला फक्त तूच जबाबदार असशील. कारण – लग्नात आलेल्या इतर पाहुण्यांना जास्त कोणी माहीत नाही आणि बाहेरच्या जगाशी संपर्क असलेला तू एकटाच आहेस.”

राणी मुखर्जीने कधीच शेअर केले नाही फोटो
राणी मुखर्जी व आदित्य चोप्रा यांचे नाते व त्यांचे लग्न हे अत्यंत गुपचूप पद्धतीने झाले होते. परदेशात अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले. यानंतर आदित्य चोप्रांचे प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्सने दोघांनी लग्न केल्याचे जाहीर केले होते. आजपर्यंत राणी मुखर्जीने तिचे लग्नाचे फोटो कधीच पोस्ट केले नाहीत. याबाबत एका मुलाखतीमध्ये राणी म्हणालेली, “माझे पती खूप खासगी व्यक्ती आहेत आणि त्यांना लग्नसुद्धा खासगी ठेवायचं होतं.”
