Rani Mukerji Talks About Sanjay Leela Bhansali : पुरस्कार प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक कलाकार आपल्याला पुरस्कार मिळावा यासाठी प्रचंड मेहनत घेत असतो, त्यामुळे जेव्हा पुरस्कार जाहीर होतो तो क्षण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. अनेक जण त्यावेळी त्यांच्या भावना व्यक्त करताना भावूक होताना दिसतात. असंच काहीसं झालेलं राणी मुखर्जीबरोबर.
राणी मुखर्जी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राणीनं तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं अनेकांची मनं जिंकली आहेत. तिला तिच्या चित्रपटांतील कामासाठी पुरस्कारही मिळाले आहेत. राणीला ‘स्क्रीन अवॉर्ड्स’कडूनही पुरस्कार मिळाला आहे.
२००६ मध्ये पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’मध्ये राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला. हा पुरस्कार तिला संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटासाठी मिळाला होता. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यावेळी पुरस्कार स्वीकारताना राणीनं संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले होते. राणी नेमकं काय म्हणालेली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
राणी मुखर्जी नेमकं काय म्हणालेली?
राणी म्हणालेली, “चित्रपटाचं आणि माझ्या कामाचं कौतुक करण्यासाठी सगळ्यांचे आभार. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास आहे आणि मी काही लोकांचे आभार न मानता इथून जाणं योग्य वाटत नाही. आधी तर मी संजय सरांचे आभार मानेन, धन्यवाद सर; तुम्ही मला ही भूमिका दिली यासाठी धन्यवाद. मला तुमच्याकडून मिळालेली ही सगळ्यात मोठी भेट आहे आणि तुम्ही माझ्या आयुष्यातली ऊर्जा आहात, आय लव्ह यू संजय! संगीता, तुझेसुद्धा मनापासून आभार. तू मला साइन लँग्वेज (सांकेतिक भाषा) शिकवलीस; तुझ्याशिवाय एकही शॉट देणं मला शक्य झालं नसतं.”
राणी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल पुढे म्हणालेली, “अमित काका, मी तुम्हाला खूप मिस केलं, तुम्ही इथे असायला हवे होतात. सर्वात छान सहकलाकार झाल्याबद्दल खूप धन्यवाद.” संजय लीला भन्साळी यांचा ‘ब्लॅक’ हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झालेला. यामध्ये राणी मुख्य भूमिकेत होती. तिच्याबरोबर अमिताभ बच्चनसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.
महत्त्वाचं म्हणजे राणीला २००६ मध्ये पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ सोहळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींसह नामांकन मिळालं होतं. तिच्याबरोबर त्यावेळी जुही चावला, कोंकणा सेन शर्मा, प्रीती झिंटा, शर्मिला टागोर या अभिनेत्रींनाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मिळालं होतं.
