Rani Mukerji Exits OMG 3 : राणी मुखर्जी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत लोकप्रिय नायकांसह स्क्रीन शेअर केली आहे. त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे बॉलीवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमार. लवकरच हे दोघे एका चित्रपटातून झळकणार होते; परंतु आता त्यांच्या चाहत्यांना या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहता येणार नाहीये.
राणी मुखर्जी व अक्षय कुमार ‘ओ माय गॉड’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. त्यामधून बऱ्याच वर्षांनंतर दोघे एकत्र झळकणार होते. परंतु, आता राणी मुखर्जीची चित्रपटातून एक्झिट झाल्याची बातमी समोर आली आहे. राणी मुखर्जीची चित्रपटातून एक्झिट का झाली आणि हे नेमकं प्रकरण काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
राणी मुखर्जीने का घेतली एक्झिट?
‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार राणी मुखर्जीची ‘ओ माय गॉडेस’ या चित्रपटातून एक्झिट झाली आहे. अभिनेत्रीने दिग्दर्शकांबरोबरच्या सर्जनशीलतेसंबंधित वैचारिक मतभेदांमुळे चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टच्या वृत्तानुसार चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल राणी मुखर्जीचा वेगळा दृष्टिकोन होता आणि दिग्दर्शक अमित राय यांनीसुद्धा त्याच दृष्टिकोनातून स्क्रिप्टकडे पाहावं, असं तिचं म्हणणं होतं. परंतु, अमित राय त्यांच्या मतावर ठाम राहिल्यानं राणी मुखर्जीनं चित्रपटातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टसमध्ये मतभेद जरी असले तरीसुद्धा राणीला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडल्याचं नमूद केलं गेलं आहे. राणी मुखर्जीच्या एक्झिटनंतर आता मेकर्स दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. काही माध्यमांच्या वृत्तानुसार राणी मुखर्जीच्या नावाची फक्त चर्चा सुरू होती, असंही म्हटलं जात आहे. राणी मुखर्जी व अक्षय कुमार बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटातून एकत्र झळकणार होते आणि त्यासाठी ते खूप उत्सुकसुद्धा होते.
माध्यमांच्या वृत्तानुसार ‘ओ माय गॉडेस’ या चित्रपटात स्त्री कलाकार केंद्रस्थानी असून, तिची आध्यात्मिक बाजू दाखवण्यात येणार आहे आणि म्हणूनच राणीच्या एक्झिटनंतर आता मेकर्स एका दमदार अभिनेत्रीच्या शोधात आहेत. त्यामुळे आता राणी मुखर्जीचा एक्झिटनंतर या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर कोणती अभिनेत्री झळकणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल.
दरम्यान, राणी मुखर्जीबद्दल बोलायचं झालं, तर अभिनेत्री अलीकडेच आलेल्या यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘मर्दानी ३’ या चित्रपटातून झळकली होती. त्यामध्ये राणी मुख्य भूमिकेत असून, या चित्रपटाच्या पूर्वीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
