62nd Maharashtra State Film Awards : मुंबईत नुकताच ६२ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या हस्ते मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांचा सन्मान करण्यात आला आहे. २०२५ चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकचा सन्मान करण्यात आला. याशिवाय स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिला प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री राणी मुखर्जीने अगदी मराठमोळ्या अंदाजात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. लाल पदर असलेली हिरव्या रंगाची सुंदर साडी, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा या लूकमध्ये राणी अगदी ‘राणीसारखी’ दिसत होती. विशेष म्हणजे पुरस्कार स्वीकारल्यावर कृतज्ञता व्यक्त करताना अभिनेत्रीने आपल्या भावना मराठीतून व्यक्त केल्या.
राणीने तिच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक करण्यात येत आहे. अभिनेत्री म्हणाली, “नमस्कार, माझ्यासाठी महाराष्ट्र फक्त एक राज्य नाहीये तर, हा महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे आणि हीच माझी कर्मभूमी आहे. तसेच ही भूमी माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. याच शहरात माझा जन्म झाला…मी लहानाची मोठी झाले, अशी ही आपली मायानगरी मुंबई. आयुष्याचे धडे मिळाले आणि सिनेमाबद्दलची शिकवण सुद्धा मला याच शहरामुळे मिळाली. यश-अपयश सगळं काही मी या भूमीवर पाहिलं. त्यामुळे आजचा हा सन्मान माझ्यासाठी खूप जास्त खास आहे. कारण, हा सन्मान मला माझ्या आपल्या लोकांकडून मिळाला आहे. मी अगदी कमी वयातच या इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं होतं. तेव्हा मला कोणाचंही पाठबळ नव्हतं. मी फक्त माझं काम मनापासून करत राहिले…माझ्यासाठी सिनेमा म्हणजे लोकांना समजून घेण्याचं एक माध्यम आहे.”
राणी पुढे सांगते, “मला अनेकदा असंही विचारलं जातं की, तुम्ही जाणून…वुमन सेंट्रिक सिनेमे निवडता. पण, असं नाहीये…मी अशा भूमिका निवडते, ज्या खऱ्या असतील, त्या भूमिकांचा प्रवास प्रेक्षकांना खरा वाटेल. मी सिनेमाकडे कधीच एक प्रोफेशन म्हणून पाहिलं नाहीये…माझ्यासाठी सिनेमा म्हणजे अत्यंत भावनिक विषय आहे आणि हा महाराष्ट्र माझ्या त्या भावनेचं मूळ घर आहे.”
“आता जेव्हा मी म्हटलं की, महाराष्ट्र म्हणजे माझी जन्मभूमी अन् कर्मभूमी आहे…हे वाक्य केवळ मी पुरस्कार सोहळ्यापुरतं म्हणत नाहीये…मी हे इतक्या ठामपणे म्हटलं कारण, माझा या वाक्यावर विश्वास आहे. मुंबई शहराने माझं बालपण पाहिलं, आधी मी लहान मुलगी होते…मग अभिनेत्री…पत्नी…आणि आता मी आईच्या भूमिकेत आहे. या शहराने खूप काही दिलं आणि आयुष्यात कधीही माघार घेऊ नकोस हा विश्वास दिला. हा पुरस्कार मी महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना, कलाकारांना, तंत्रज्ञांना, दिग्दर्शकांना आणि आमच्या फिल्म इंडस्ट्रीला डेडिकेट करते. या पुरस्कारासाठी कायम माझ्या मनात एक वेगळी जागा असेल. कारण, या अवॉर्डकडे पाहून मला माझी मुंबई आणि माझा महाराष्ट्र कायम आठवेल. तुमचं प्रेम असंच राहूद्या, तुमचा आशीर्वाद असाच राहूद्या…खूप-खूप धन्यवाद! जय हिंद, जय महाराष्ट्र!” अशा भावना राणी मुखर्जीने व्यक्त केल्या आहेत.
