लग्नाला कुटुंबाचा विरोध, वैवाहिक जीवन तसेच लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांवर भाष्य करणारा ‘साथिया’ सिनेमा २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. राणी मुखर्जी आणि विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात होत्या. तगडी स्टारकास्ट, उत्तम कथानक, यश चोप्रांची निर्मिती, ए.आर.रहमानचं संगीत या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असलेल्या ‘साथिया’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली होती. ‘साथिया’मुळे विवेकच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली होती. आजही या सिनेमातील सगळी गाणी प्रेक्षकांच्या मनावर कोरलेली आहेत.
पण, तुम्हाला माहितीये का? या ब्लॉकबस्टर सिनेमाला सुरुवातीला राणी मुखर्जीने नकार दिला होता. त्यानंतर यश चोप्रांनी तिची कशी समजूत काढली, याबद्दल राणीने स्वत: काही वर्षांपूर्वी न्यूज १८ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
राणीच्या ‘मुझसे दोस्ती करोगी’ सिनेमाला म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं. तिच्याकडे जवळपास आठ महिने काहीही काम नव्हतं. याबद्दल राणी सांगते, “मुझसे दोस्ती करोगी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर निराशा केली होती. तो चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माझ्याकडे जवळपास आठ महिने कोणतंही काम नव्हतं. मी घरात असायचे. राणीचं करिअर आता संपलं आहे अशा बातम्याही तेव्हा सर्वत्र पसरू लागल्या होत्या. मला त्या बातम्यांचा खरंच काहीच फरक पडत नव्हता. पण, मी खरंच एका चांगल्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत होते.”
राणी पुढे सांगते, “मला याचदरम्यान यश अंकलने ‘साथिया’ चित्रपटासाठी विचारलं. पण, मला तेव्हा प्रत्येक निर्णय विचार करून घ्यायचा होता. मनात एक वेगळीच भीती होती, कोणताही चुकीचा निर्णय मला घ्यायचा नव्हता. त्यामुळे भीतीनेच मी त्यांना नकार कळवला होता. माझा नकार ऐकल्यावर यश अंकलने माझ्या आई-बाबांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं होतं. त्यावेळी माझ्या आई-बाबांनी, ‘राणीला हा चित्रपट करण्याची अजिबात इच्छा नाहीये’ असं त्यांना सांगितलं होतं.”
तोपर्यंत तुझ्या आई-बाबांना मी बाहेर जाऊ देणार नाही….
“आई-बाबांशी चर्चा केल्यावर यश अंकलनी मला फोन केला. ते म्हणाले होते, ‘बेटा तू खूप मोठी चूक करत आहेस. मी आता तुझे आई-बाबा ज्या खोलीत आहेत तो दरवाजा बंद करून घेतला आहे. जोपर्यंत तू चित्रपटासाठी होकार कळवत नाहीस तोपर्यंत तुझ्या आई-बाबांना मी बाहेर जाऊ देणार नाही. यश अंकलनी त्यांना लॉक केलं होतं आणि त्या गोष्टीसाठी मी त्यांची खरंच आभारी आहे. त्यांच्यामुळे मला एवढा सुंदर चित्रपट करता आला.” अशा भावना राणीने व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, १३ ऑक्टोबर २०१२ मध्ये यश चोप्रा यांचं निधन झालं. पुढे २०१४ मध्ये राणीने यशजींचा मोठा मुलगा आदित्य चोप्राबरोबर लग्न केलं. आता दोघांनाही आदिरा नावाची गोड मुलगी आहे.
