Aditya Chopra’s Reaction On Rani Mukerji’s Kissing Scene : बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांनी आतापर्यंत प्रेमावर आधारित अनेक चित्रपट बनवले आहेत आणि त्यातून प्रेमाच्य वेगवेगळ्या व्याख्या मांडल्या आहेत. वेगवेगळ्या कथा त्यामधून पाहायला मिळाल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे २००४मध्ये प्रदर्शित झालेला राणी मुखर्जी व सैफ अली खान यांचा ‘हम तुम’ हा सिनेमा.
‘हम तुम’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय चित्रपट आहे. यातील सैफ अली खान व राणी मुखर्जी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अनेकांना आवडली. पण, तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांशी फार बोलत नव्हते आणि महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात एक किसींग सीनसुद्धा आहे जो पाहिल्यानंतर राणी मुखर्जीचे पती चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा गोंधळले होते. त्यावेळी दोघांचं लग्न झालेलं नव्हतं. स्वत: चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीच याबद्दल सांगितलं आहे.
‘हम तुम’मध्ये सैफ आणि राणीने करण आणि रिया या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात रोमान्स आणि विनोद दोन्ही होते. २२ वर्षांनंतरही हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. पण पडद्यामागे मात्र हा चित्रपट जवळपास बंद पडण्याच्या स्थितीत पोहोचला होता, हे प्रेक्षकांना कधीच कळलं नाही.
राणी आणि सैफमध्ये होते वाद
चित्रपटाचे दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. सेटवर सगळंच बिनसलं होतं. एका बाजूला सैफ, तर दुसऱ्या बाजूला राणी आणि ते असं चित्र होतं असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “ऑफस्क्रीन ते एकमेकांना फारसे पसंत करत नव्हते. शूटिंगच्या पहिल्या अर्ध्या भागात असं वाटायचं की एका बाजूला मी आणि राणी आहोत, आणि सैफ एकटा आहे. माझं आणि सैफचं पटत नव्हतं, तसंच सैफ आणि राणीचंही पटत नव्हतं.”
शूटिंगचं आम्स्टरडॅममधील वेळापत्रक सुरू असताना कुणाल कोहली यांनी या विषयावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सैफला बाजूला घेऊन स्पष्ट शब्दांत सांगितलं. ते म्हणाले, “ऐक, हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. हा चालला नाही, तर तुला नायकाच्या भूमिका मिळणार नाही. मग तुला कल हो ना हो सारख्या चित्रपटांमध्ये फक्त शाहरुख खानबरोबर साहाय्यक भूमिका कराव्या लागतील.”
त्या संभाषणानंतर वातावरण लगेचच बदललं, असं कुणाल कोहली यांनी सांगितलं. “त्या दिवसानंतर आमचं एकमेकांशी खूप छान जुळायला लागलं. मग आम्ही सगळेच एकमेकांशी चांगलं वागू लागलो. पण सुरुवातीला राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांचं पटत नव्हतं, माझं आणि सैफचंही पटत नव्हतं.” कुणाल यांनी या वादामागचं कारणही स्पष्टपणे सांगितलं. कोणताही मोठा वाद किंवा एखादी ठराविक घटना यामागे नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते सगळेच तरुण आणि थोडे हट्टी होते आणि प्रत्येकामध्ये भरपूर अॅटिट्यूड होता. ते म्हणाले, “फक्त राणीनेच त्या वेळी हिट चित्रपट दिले होते. मी आणि सैफ तितके यशस्वी नव्हतो. पण तरीही आमच्यात खूप अॅटिट्यूड होता.”
किसिंग सीनसाठी राणीने दिलेला नकार
टायटल ट्रॅकमधील एका रोमँटिक सीनमध्ये राणीला ऑनस्क्रीन किसिंग सीन करायचा होता. पण २००० च्या सुरुवातीच्या काळात असे सीन अजूनही खूप मोठी गोष्ट मानली जायची, त्यामुळे राणी सुरुवातीला खूप साशंक होती. शेवटी ती एका टेकसाठी तयार झाली. मात्र कुणाल कोहली यांच्या मते, तो टेक अपेक्षेप्रमाणे झाला नाही. त्यानंतर जे झालं, ते पाहून निर्माते आदित्य चोप्रासुद्धा चकित झाले. फुटेज पाहिल्यानंतर ते म्हणाले, “तो सीन नीट पाहिलात तर लक्षात येईल की राणी प्रत्यक्षात हसत होती. ती बाजूला वळून हलत होती कारण तिला हसू आवरत नव्हतं. एडिटमध्ये तो सीन पाहिल्यावर मला वाटलं, अरे ही तर हसतेय. त्यामुळे हिंदी सिनेमातील सर्वात खराब किसिंग सीनपैकी तो एक असावा.” ते म्हणाले, “आम्ही रात्रभर शूटिंग करत होतो. सुरुवातीला ती म्हणाली की ती किसिंग सीन करणार नाही. शेवटी ती म्हणाली ठीक आहे, मी एकच टेक देईन.”
शेवटी या सगळ्या गोष्टींमुळे ‘हम तुम’च्या यशावर काहीही परिणाम झाला नाही. चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं, सैफला मुख्य अभिनेता म्हणून नवी ओळख मिळाली आणि कुणाल कोहली यांना त्यांनी ठरवलेली प्रेमकथा यशस्वीपणे मांडता आली.
