Unknown facts about actor Ranjeet: काही कलाकारांनी खलनायकाच्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान तयार केले. बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते रणजीत हे त्यापैकीच एक आहेत.
२०० हून अधिक सिनेमांत साकारली खलनायकाची भूमिका
७० व ८० च्या दशकात अनेक कलाकारांनी खलनायकांच्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यामध्ये अमरीश पुरी, प्रेम चोपडा, अमजद खान, प्राण या कलाकारांची नावे घेतली जातात. या यादीत अभिनेते रणजीत यांच्या नावाचाही समावेश होतो. आज त्यांचा वाढदिवस आहे. ते ८५ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही गोष्टी जाणून घेऊ…
रणजीत यांचा जन्म १३ सप्टेंबर १९४१ रोजी पंजाबमधील अमृतसर येथील जंडियाला गुरू येथे झाला. त्यांचे खरे नाव गोपाल सिंग बेदी आहे. त्यांनी नंतर नाव बदलले. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेले, “लोक मला ‘गोली’ म्हणायचे. मी एक फुटबॉलपटू होतो. मी माझ्या तीन मित्रांसोबत हवाई दलाची परीक्षा दिली आणि त्यानंतर आम्ही ट्रेनिंगसाठी कोइम्बतूरला गेलो. पण, तिथल्या ट्रेनरशी माझे पटले नाही आणि त्यामुळे मी परत दिल्लीला आलो.”
रणजीत यांनी १९७० ला प्रदर्शित झालेल्या ‘सावन भादो’ चित्रपटातून पदार्पण केले. १९७१ ला प्रदर्शित झालेल्या ‘शर्मिली’ या चित्रपटातून त्यांना विशेष ओळख मिळाली. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. सिनेमात त्यांचे पात्र राखी गुलजारवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करते, असा सीन होता. तो सीन पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला. वडिलांनी त्यांना घरातून हाकलून दिले.
रणजीत यांनी जवळजवळ २०० हून अधिक सिनेमांत खलनायकाची भूमिका साकारली. त्यापैकी १५० सिनेमांत त्यांनी बलात्काराचे सीन केले.
सिनेमात खलनायक म्हणून काम करणारे रणजीत हे खऱ्या आयुष्यात कधीही दारू प्यायले नाहीत. तसेच मांसाहारही केला नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी अलोका बेदीबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना आता दोन मुले आहेत. दिव्यांका व चिरंजीव, अशी त्यांची नावे आहेत. ते त्यांच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतात. ८५ व्या वर्षीही ते बॉलीवूडमध्ये काम करतात. विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
