Rajinikanth Reviews Dhurandhar 2 : सध्या आदित्य धर व रणवीर सिंह यांचा ‘धुरंधर २’ अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.
‘धुरंधर’प्रमाणे ‘धुरंधर २’चंही प्रेक्षक भरभरून कौतुक करीत आहेत. रणवीर सिंहच्या अभिनयाचं आणि आदित्य धरच्या दिग्दर्शनाचं अनेक जण कौतुक करत आहेत. त्यामध्ये अनेक कलाकारांचाही समावेश आहे. बॉलीवूडपासून दाक्षिणात्य कलाकार सर्वांनीच या चित्रपटाचं कौतुक केलं. विशेषकरून दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अभिनेते ‘धुरंधर २’बद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत. अशातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीसुद्धा ‘धुरंधर २’बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
रजनीकांत यांनी केलं कौतुक
रजनीकांत यांनी ‘धुरंधर २’बद्दल प्रतिक्रिया देत आदित्य धरचं कौतुक केलं आहे. एक्सवर ट्वीट करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवरून रजनीकांत आदित्य धरच्या ‘धुरंधर २’बद्दल म्हणाले, “काय कमाल चित्रपट आहे… ‘धुरंधर २’. आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप. रणवीर सिंह आणि चित्रपटातील कलाकार व इतर सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा! प्रत्येक भारतीयाने पाहावा असा चित्रपट. जय हिंद”.
रजनीकांत यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देत दिग्दर्शक आदित्य धर म्हणाला, “आम्ही तुम्हाला पाहून मोठे झालो आहोत. तुम्ही आम्हाला शिटी वाजवायला, टाळ्या वाजवायला लावलं. खूप हसवलं आणि रडवलंसुद्धा आहे. कित्येक दशकं तुम्ही ते करत आला आहात. ती खरंच एक जादू आहे. त्यामुळे तुम्ही ‘धुरंधर २’ सगळ्यांनी पाहावा असा चित्रपट आहे हे म्हणणं मला माझ्या आयुष्यातील खूप मोठा क्षण वाटत आहे. ज्यांनी मला खूप मोठी स्वप्नं बघायला शिकवली. त्यांच्याकडून हा मला मिळालेला आशीर्वाद आहे, असं मला वाटतं. मी खूप ऋणी आहे. माझ्याकडे शब्द नाहीयेत. तुमच्या या कौतुकामुळे मला खूप आनंद झाला. जय हिंद.”
What a film … #Dhurandhar2 !!! Aditya Dhar ? box office -ka baap !!! Many congratulations to Ranveer and the entire cast and crew. A must watch film for every indian. Jai hind ?? @AdityaDharFilms @RanveerOfficial
— Rajinikanth (@rajinikanth) March 23, 2026
दरम्यान, अल्लु अर्जुन, महेश बाबू, ज्युनियर एनटीआर यांसह इतर काही दाक्षिणात्य कलाकारांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तर बॉलीवूडमधूनही आलिया भट्ट, राजकुमार राव, प्रीती झिंटा, अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख, शिल्पा शेट्टी, आयुष्मान खुराना, राकेश रोशन, अनुपम खेर, अक्षय कुमार यांसारख्या मंडळींनी आदित्य धर व रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’मधील कामाचं कौतुक केलं आहे.
