बॉलीवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंह सध्या एका मोठ्या वादात सापडला आहे. त्याने ‘डॉन ३’ सिनेमातून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे फरहान अख्तरने रणवीरविरोधात तक्रार केली असून, यानंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने ( FWICE ) अभिनेत्याविरोधात असहकार निर्देश जारी केला आहे. ‘डॉन ३’ चित्रपटाचं शूटिंग सुरू व्हायला तीन आठवडे बाकी राहिले असताना रणवीरने निर्माते आणि दिग्दर्शकाबरोबर झालेल्या वादामुळे या सिनेमातून माघार घेतली. यामुळे चित्रपटाच्या टीमचं मोठं नुकसान झालं. फरहान अख्तरने याबाबत फेडरेशनकडे तक्रार दाखल केली पण, वारंवार चर्चेसाठी बोलावूनही रणवीरने प्रतिक्रिया दिली नाही. म्हणूनच ‘FWICE’ने थेट बंदीचे आदेश दिले आहेत.
इंडस्ट्रीमधील कोणत्याच व्यक्तीने रणवीरबरोबर काम करू नये असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या वादाची सध्या संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आता ‘FWICE’ने घातलेली बंदी म्हणजे नेमकं काय जाणून घेऊयात…
FWICE बंदी म्हणजे काय?
FWICE ने जारी केलेली बंदी हा इंडस्ट्रीसाठी एक ‘असहकार निर्देश’ आहे, ही कायदेशीर बंदी नाही. या अंतर्गत चित्रपटाशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि इतर तंत्रज्ञांना शूटिंग किंवा निर्मितीदरम्यान रणवीरबरोबर काम न करण्यास सांगितलं आहे. हा फेडरेशनचा निर्णय आहे, सरकारचा नाही…त्यामुळे एखाद्या अभिनेत्याला चित्रपट साइन करण्यापासून कायदेशीररित्या रोखलं जात नाही. मात्र, जोपर्यंत ‘डॉन ३’चे निर्माते आणि रणवीर यांच्यात झालेल्या वादावर तोडगा निघत नाही तोपर्यंत रणवीर भारतात नव्या चित्रपटांचं शूटिंग किंवा निर्मिती करू शकणार नाहीये.
रणवीरला वैयक्तिकरित्या हजर राहून आपली बाजू स्पष्ट करण्याची संधी अनेकदा देऊनही त्याने प्रतिसाद दिला नसल्याचा दावा फेडरेशनने केला आहे. तर ‘डॉन ३’ची निर्मिती करणाऱ्या एक्सेल एंटरटेन्मेंटने रणवीरने नुकसान भरपाई म्हणून ४५ कोटी रुपये ( प्री-प्रोडक्शन खर्च ) द्यावेत, अशी मागणी केली आहे.
या सगळ्या वादादरम्यान रणवीर मंगळवारी सकाळी ( २६ मे २०२६ ) म्हैसूर येथे पोहोचला. अभिनेत्याने कर्नाटकातील म्हैसूर येथील प्रसिद्ध चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि मनोभावे पूजा केल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सकाळी ७:३० वाजता तो या मंदिरात पोहोचला होता. त्याने साधारण १० मिनिटं गर्भगृहात प्रार्थना केली.
रणवीरच्या टीमची प्रतिक्रिया
या संपूर्ण वादावर रणवीरच्या टीमने निवेदन जारी केलं आहे. रणवीरने ‘डॉन ३’ चित्रपटासंदर्भात जाणीवपूर्वक शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, प्रोफेशनल गोष्टी कायम आदर, सन्मान राखून सोडवल्या गेल्या पाहिजेत. ज्या काही अफवा-चर्चा सुरू आहेत त्याबाबत रणवीर कधीच सार्वजनिकरित्या उत्तर देणार नाही. त्याचं संपूर्ण लक्ष त्याने आगामी प्रोजेक्ट्सवर केंद्रीत केलेलं आहे. डॉन फ्रँचायचीसंबंधित सर्वांबाबत त्याच्या मनात सन्मान आणि सद्भावना आहेत. ही सीरिज यशस्वी ठरो, अशी त्याची प्रमाणिक इच्छा आहे असं त्याच्या टीमने म्हटलं आहे.
दरम्यान, आता रणवीरसंदर्भात इंडस्ट्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
