Ranveer Singh Birthday : हटके स्टाईल आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता रणवीर सिंह आज ६ जुलै रोजी वाढदिवस साजरा करत आहे. त्याने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले आहे. रणवीरच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. रणवीर सिंह हा सिनेविश्वातील प्रचंड लोकप्रिय अभिनेता बनला असून तो यशाच्या शिखरावर आहे. रणवीर सिंहच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्ताने ‘धुरंधर’ चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी खास पोस्ट लिहिली आहे. ‘धुरंधर’च्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा देत आदित्य यांनी रणवीरच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तसेच रणवीर केवळ अभिनेता नाही, तर भाऊ असल्याची भावनाही आदित्य धरने व्यक्त केल्या आहेत.

दिग्दर्शक आदित्य धर यांनी रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक करत रणवीरला शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य धर यांनी लिहिले, “काही चित्रपट हे कायमस्वरूपी आपल्याबरोबर असतात, माझ्यासाठी धुरंधर हा त्यापैकीच एक आहे. फक्त आम्ही सांगितलेल्या गोष्टीसाठी नाही तर फार थोड्या दिग्दर्शकांना अनुभवायला मिळणाऱ्या गोष्टी मला या चित्रपटामुळे अनुभवता आल्या आणि त्याचा साक्षीदार होता आले. तू एक असामान्य कलाकार आहेस, हे तर मला आधीपासूनच माहीत होते. पण, ‘धुरंधर’च्या या प्रवासामुळे फक्त कलाकार म्हणून नाही तर त्यामागील माणूस म्हणून तू जास्त आवडू लागला.”

सरस्वती देवीचा तुझ्यावर आशीर्वाद – आदित्य धर

पुढे त्यांनी लिहिले, “‘धुरंधर’च्या शूटिंगवेळी असे अनेक दिवस होते, जेव्हा मला मी अत्यंत दुर्मीळ गोष्टीचा साक्षीदार होतोय असे जाणवत होते. २६/११ हल्ल्याचा सीन, शेवटचा चहाच्या टपरीचा सीन, पठाणकोट हल्ल्याचा, पंप हाऊसचा आणि कोर्टाबाहेरचा सीन… असे कितीतरी सीन. प्रत्येक टेक, प्रत्येक सीनमध्ये तू कधीही सोपा मार्ग निवडला नाहीस. प्रत्येक भावना योग्य रितीने पोहचवल्या आणि त्या अचूक पोहोचल्या. प्रत्येक शांततेला अर्थ होता. प्रत्येक नजरेमागे हेतू होता. प्रत्येक क्षण परिपूर्ण होता आणि प्रत्येक पैलू योग्य होता. तुझे सातत्यपूर्ण काम करणे हे समजण्यापलीकडचे आहे. खरंच असं वाटत होतं की, तुझ्यावर दैवी कृपा आहे, जणू माता सरस्वतीने स्वतः तुझ्या डोक्यावर हात ठेवून तिच्याकडील प्रत्येक कलागुणाचा आशीर्वाद तुला दिला आहे.”

आदित्य धरने लिहिले, “दिग्दर्शक म्हणून आपण काही क्षण अनुभवण्याची अपेक्षा पूर्ण करिअरमध्ये नेहमी करत असतो; पण तू मला असे क्षण पुन्हा पुन्हा दिलेस. माझा ठाम विश्वास आहे की, ‘धुरंधर’मधील तुझा अभिनय हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वोत्तम अभिनयांपैकी एक आहे. हा फक्त अभिनय नाही, तर निसर्गाच्या शक्तीप्रमाणे आहे. निर्भय, भव्य आणि इतका परिपूर्ण अभिनय आहे की, भूमिकेच्या आत्म्यामध्ये तू समरस होऊन गेला आहे. लोक या अभिनयाबद्दल अनेक वर्षे, कदाचित येणाऱ्या पिढ्यांपर्यंत चर्चा करतील, याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही.”

‘धुरंधर’साठी स्वतःचं सर्वस्व दिल्याबद्दल… – आदित्य

आदित्य धर यांनी धुरंधरच्या सेटवरच्या आठवणी सांगत लिहिले आहे की, “ॲक्शन आणि कट यामधील जे क्षण आहेत, ते आपण जपून ठेवले पाहिजेत. ते क्षण, आपल्या गप्पा, आपला एकमेकांवरचा विश्वास आणि प्रत्येक सीन परिपूर्ण करण्यासाठी घेतलेली अथक मेहनत, या सगळ्या प्रवासामध्ये तू अभिनेता आणि मी दिग्दर्शक असे राहिलो नाही, तर तू माझा भाऊ झाला. तुझं मन, तुझी कला आणि तुझं चित्रपटाबद्दल वेड माझ्यावर विश्वासाने सोपवल्याबद्दल धन्यवाद. ‘धुरंधर’साठी स्वतःचं सर्वस्व दिल्याबद्दल धन्यवाद. आपण दोघांनी मिळून जे निर्माण केलं आहे, त्याचा मला मनापासून अभिमान आहे. नेहमीच तुझ्यावर प्रेम राहील, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, भावा.”