Ranveer Singh decides to stay away from media : बॉलीवूडचा ‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंह हा काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ‘डॉन ३’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने (FWICE) त्याच्या विरोधात असहकार निर्देश जारी केला होता. रणवीरला बॉलीवूडमधून बॅन करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर हा बॅन मागे घेण्यात आला असला तरी आता अभिनेत्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निर्माता फरहान अख्तरसह झालेल्या मतभेदानंतर रणवीर सिंहने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, अभिनेता रणवीर सिंहने मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय फक्त काही महिन्यांसाठी नाही तर तब्बल दीड वर्षांसाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या वादावर अनेकांनी रणवीर सिंहची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॉलीवूडमध्ये काम करण्याबाबत असहकार घोषित झाल्यानंतर अभिनेत्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले होते. तसेच आता त्याने मीडियापासून आणि मुलाखतींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. रणवीर सिंह हा त्याच्या आगामी जय मेहता यांच्या ‘प्रलय’ चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत माध्यमांशी संवाद साधणार नसल्याचे समोर आले आहे.

रणवीर सिंहच्या निर्णयामुळे चर्चांना उधाण

मीडिया रिपोर्टनुसार, एका पत्रकाराची रणवीर सिंहची भेट झाली असून त्याने माध्यमांशी यापुढे कोणताही संवाद साधणार नसल्याचे सांगितले आहे. हा पत्रकार म्हणाला की, “मी रणवीर सिंहला प्रत्यक्ष भेटलो तेव्हा त्याने सांगितले की, तो ‘डॉन ३’ प्रकरणातील वादावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही आणि या पुढे किमान १८ महिने तरी कोणतीही मुलाखतही देणार नाही. रणवीर सिंहच्या या निर्णयामुळे चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी रणवीरचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

‘डॉन ३’ चित्रपटावरून वाद

‘डॉन ३’ सिनेमातून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे निर्माता फरहान अख्तरने रणवीर विरोधात तक्रार केली होती. यानंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने ( FWICE ) अभिनेत्या विरोधात असहकार निर्देश जारी केला होता. शूटिंग सुरू होण्यास तीन आठवडे बाकी राहिले असताना रणवीरने निर्माते आणि दिग्दर्शकाबरोबर झालेल्या वादामुळे या सिनेमातून माघार घेतली होती. चित्रपट निर्माते व रणवीर सिंहमधील हा वाद जोरदार चर्चेत आला होता. रणवीर सिंहने अचानक चित्रपट सोडल्याने ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा ‘डॉन ३’च्या निर्मात्यांकडून करण्यात आला होता.

रणवीर सिंह लवकरच पुन्हा एकदा होणार बाबा

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंह या जोडप्याने ही आनंदाची बातमी शेअर केली होती. २०२४ साली दीपिकाने ‘दुआ’ या गोंडस मुलीला जन्म दिला. आता २०२६ साली रणवीर-दीपिका नव्या बाळाचे स्वागत करणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रणवीर व दीपिका वांद्रे परिसरामध्ये नव्या घराच्या कामाची पाहणी करताना दिसून आले होते. यावेळी दीपिका तिचा बेबी बंप फॉन्ट करताना दिसून आली.