दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह १९ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. या दोघांना आधी एक मुलगी असून तिचं नाव दुआ आहे. आता ते दोन मुलींचे पालक झाले आहेत. दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर दीपिकाची एक जुनी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे. आई होण्याच्या अनेक वर्षांपूर्वी दीपिकाने एका मुलाखतीत तिच्या कुटुंबाबद्दलच्या कल्पनेविषयी बोलताना तिला तीन लहान मुलं हवी असल्याचं सांगितलं होतं.

२०१३ मध्ये राजीव मसंद यांच्याबरोबर झालेल्या एका राऊंडटेबल चर्चेदरम्यान दीपिका पादुकोणला अभिनय क्षेत्रात काम केलं नसतं तर तिचं आयुष्य कसं असतं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. आपण कोणत्या क्षेत्रात काम केलं असतं, याबद्दल तिला नक्की माहिती नव्हती. मात्र, भविष्यातील कुटुंबाबद्दल तिच्या मनात एक स्पष्ट चित्र होतं.

दीपिका कुटुंब नियोजनाबद्दल काय म्हणालेली?

दीपिकाने सांगितलं होतं की, तिला काम सुरू ठेवायचं होतं आणि त्याचबरोबर मुलंही असावीत, अशी तिची इच्छा होती. तिने घरात तीन लहान मुलं खेळत असतील, अशी कल्पनाही केली होती. ती म्हणाली होती, “मी अभिनेत्री नसते तर काय केलं असतं, हे मला माहीत नाही. पण आशा आहे की माझ्याबरोबर काही मुलं असतील. तीन लहान मुलं घरात इकडे-तिकडे फिरत असतील. त्यांना माझ्याबरोबर शूटिंगला घेऊन जाता येईल काम करत राहावं आणि एक आनंदी कुटुंब असावं, अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर मी जे करत आहे, तेही सुरू ठेवायचं आहे.”

रणवीर सिंहनेही मुलांबाबतचा निर्णय दीपिकावर सोपवला होता

लग्नानंतर रणवीर सिंहनेही भविष्यात कुटुंब वाढवण्याबाबत भाष्य केलं होतं. ‘इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना त्याला कुटुंबाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी या निर्णयामध्ये दीपिका पादुकोणची महत्त्वाची भूमिका असेल, असं रणवीरने स्पष्ट केलं होतं. रणवीर म्हणाला होता, “हा पूर्णपणे माझा निर्णय नाही. काही अंशी हा माझा निर्णय आहे, पण मुख्यतः हा निर्णय तिचाच आहे आणि मी तिला तो निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतो. बहुतेक निर्णय तीच घेते, कारण ती प्रत्येक गोष्टीत माझ्यापेक्षा चांगली आहे. हे मान्य करण्यात मला अजिबात संकोच नाही की ती माझ्यापेक्षा खूपच समजूतदार आणि प्रगल्भ व्यक्ती आहे.”

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह दोन मुलींचे पालक

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलगीचं स्वागत केलं होतं. जवळपास दोन वर्षांनंतर १९ सप्टेंबर रोजी या जोडप्याला पुन्हा एकदा मुलगी झाली. आता दीपिका आणि रणवीर यांचं चार जणांचं कुटुंब झालं आहे.