Ranveer Singh Made Deepika Padukone Cry At An Award Show : दीपिका पादुकोण व रणवीर सिंह बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. दोघेही अनेकदा एकमेकांबद्दल मुलाखतींमधून बोलत असतात, कौतुक करत असतात. पण, एकदा एका पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंहमुळे दीपिका पादुकोण रडली होती.
रणवीर सिंह त्याच्या बोलक्या आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखला जातो. तो अनेकदा बायको दीपिकाबद्दलही खूप बोलत असतो आणि तिचं कौतुक करत असतो. पण, एकदा मात्र त्याच्यामुळे त्याच्या बायकोच्या डोळ्यांत अश्रू आले होते. रणवीर सिंह ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्यात दीपिकाला काय म्हणालेला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
२०१८ मध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यापैकीच एक म्हणजे दीपिका आणि रणवीर. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपटातील कामासाठी रणवीर सिंहला त्यावेळी सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला. त्यावेळी त्यानं मनोगत व्यक्त केलं होतं.
दीपिकाला का झालेले अश्रू अनावर?
पुरस्कार सोहळ्यातील भावनिक भाषणादरम्यान रणवीरनं दीपिकाचे आभार मानले होते. अभिनेता दीपिकाबद्दल म्हणालेला, “चित्रपटात मला माझी राणी नाही मिळाली; पण खऱ्या आयुष्यात मला माझी राणी मिळाली. जर मी गेल्या सहा वर्षांत काहीही मिळवलं असेल, तर त्यामागचं कारण तू आहेस. तू मला नेहमीच कृतज्ञ राहायला शिकवलंस.”
रणवीर पुढे म्हणालेला, “मला यावेळी मला ही संधी दिल्याबद्दल संजय लीला भन्साळी यांचेसुद्धा आभार मानायचे आहेत. तुम्ही मला कलाकार म्हणून घडवलं आहे. आय लव्ह यू सर! सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद! माझे आई-बाबा, बहीण- मी जे काही आहे, ते सगळं तुमच्यामुळे. सर्वांचे आभार.” ‘पद्मावत’ चित्रपटात रणवीर व दीपिका यांनी एकत्र काम केलं होत. रणवीरनं खलनायकाची भूमिका साकारली होती.
रणवीरनं पुढे त्याच्या आजीला हा पुरस्कार समर्पित करीत भावना व्यक्त केल्या होता. अभिनेता म्हणालेला, “मी हा पुरस्कार माझ्या आजीला समर्पित करत आहे. गेल्या वर्षी ती आम्हाला सोडून गेली. मला आठवतंय. तिच्या शेवटच्या दिवशी माझी बहीण तिच्याबरोबर होती. मी तिला बोलावलं आणि विचारलं की, आजी कशी आहे, ती काय करतेय? त्यावर तिनं मला आजी ‘खली बली’ गाणं ऐकत आहे, असं म्हणालेली. जे ती दररोज नाश्ता करताना ऐकते. त्यानंतर मला जो फोन आला तेव्हा कळलं की, ती आम्हाला सोडून गेली आणि त्यावेळी ती माझं तेच गाणं ऐकत होती. त्यामुळे आजी मला माहीत आहे तू मला वरून आशीर्वाद देत आहेस. मला तुझी खूप आठवण येते. हा पुरस्कार तुझ्यासाठी आहे.”
