Ranveer Singh Emotional Video : रणवीर सिंह बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. तो सध्या ‘धुरंधर २’मुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. त्याच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटानं अनेक सुपरहिट चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले आहेत.
रणवीर सिंह कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनेता त्याच्या स्पष्ट वक्तेपणासाठी आणि मन मोकळ्या स्वभावासाठी ओळखला जातो. अनेकदा पुरस्कार सोहळ्यांमध्ये तो प्रचंड उत्साहात दिसतो. नेहमी त्याच्या हटके स्टाईलनं इतरांना हसवत असतो. पण, एकदा पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांना हसवणारा रणवीर चक्क रडला होता. अभिनेत्याला भरमंचावर अश्रू अनावर झाले होते. हा किस्सा आहे त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी त्याला मिळालेल्या पुरस्कार सोहळ्यातला.
रणवीर सिंह झालेला भावुक
२०११मध्ये पार पडलेल्या ‘स्क्रीन अवॉर्डस्’ सोहळ्यात रणवीरनं त्याच्या करिअरमधील महत्त्वाचा क्षण अनुभवला होता. अभिनेत्यला त्याच्या पदार्पणातील ‘बँड बाजा बरात’ या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. रणवीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेला असताना तिथे त्यावेळी शाहरुख खान व शाहिद कपूरसुद्धा उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर रणवीरनं भावुक होत त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार तेव्हा रणवीर म्हणालेला, “मला माफ करा. पण, हा क्षण माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मी लहान असल्यापासून मला अभिनेता व्हायचं होतं आणि इथे उपस्थित राहायचं होतं. आज मी त्याच मंचावर या सगळ्यांबरोबर उभा आहे. माझ्यासाठी हे खूप स्वप्नवत आहे. धन्यवाद आदि सर माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी.” मनिष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रानं केली होती.
रणवीर पुढे म्हणालेला, “हा पुरस्कार बँड बाजा बरातच्या संपूर्ण टीमसाठी आहे. तुम्ही सगळे खूप खास आहात. आई, बाबा आणि माझी प्रिय बहीण रितीका मी जे काही करतो ते तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटावा म्हणून करतो. सगळ्यांचे खूप खूप आभार मी तुम्हाला वचन देतो की पुढे मी अजून खूप काही छान करणार आहे.” रणवीरचं बोलून झाल्यानंतर तो स्टेजवरुन खाली उतरत असताना तिथे उपस्थित असलेल्या शाहरुखनं त्याला थांबवलं आणि त्याला हसवण्याचा प्रयत्न केला.
शाहरुख रणवीरला म्हणाला, “कुठे जातोय तू, का रडतोयस? आम्हाला तुझी गरज आहे. तू आता इंडस्ट्रीत आला आहेस त्यामुळे आमचं कसं होईल. ये आम्हाला मिठी मार आमच्यावर प्रेम कर आणि आम्हाला तुला सांगायचं आहे की तू एक कलाकार म्हणून किती छान आहेस.” पुढे तिथे उपस्थित असलेल्या करण जोहरनं रणवीरला त्याच्या गाण्यावरील हुक स्टेप्स त्यांना शिकवायला सांगितले. त्यानंतर रणवीर, शाहिद, शाहरुख आणि करण एकत्र डान्स करताना दिसले.
