Rakesh Bedi reply to Dhurandhar 2 Trollers : आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. भारताकडून पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलेल्या स्पाय एजंटवर आधारित या चित्रपटाने थरारक कथानक, जबरदस्त अॅक्शन आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. विशेषतः रणवीर सिंहच्या प्रभावी भूमिकेने प्रेक्षकांना थक्क केले आहे; तर गाणी आणि अॅक्शन सीक्वेन्सही प्रचंड गाजले. या सगळ्यात आणखी एक लक्षवेधी भूमिका ठरली ती म्हणजे जमील जमाली. ही भूमिका अभिनेते राकेश बेदी यांनी साकारली होती. राकेश यांनी ‘धुरंधर’ चित्रपटाचे अनुभव आणि आठवणी सांगितल्या आहेत. तसेच या चित्रपटाला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना राकेश बेदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
स्पाय थ्रिलर चित्रपटात विनोदी डायलॉग
बुधवारी नवी दिल्लीतील ‘अमृत रत्न २०२६’ परिषदेत राकेश बेदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ‘धुरंधर’ या सुपरहिट चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल आठवणी शेअर केल्या आहेत. ते म्हणाले की, “जेव्हा चित्रपटाची कथा दोन ते तीन वेळा वाचली तेव्हाच माझ्या लक्षात आले की, चित्रपट फक्त गंभीर नाही तर अतिशय गंभीर आणि इन्टेन्स असणार आहे. एक कलाकार म्हणून माझा नेहमी कॉमेडीकडे कल असतो. विनोदी विचार करणारा असल्याने या भूमिकेमध्ये थोडे फार विनोद करून वातावरण हलके करू शकतो असा विचार होता. पण, हा चित्रपट स्पाय थ्रिलर असल्यामुळे यामध्ये कॉमेडी सीन घेण्यास आदित्य धर तयार नव्हते. मी आदित्य यांना म्हणालो, ‘पात्रामध्ये अशा काही जागा आहेत, जिथे आपण विनोद आणू शकतो, तसा प्रयत्न करून बघायचा का? असे विचारले होते. यावर आदित्य धर म्हणाले की, ‘राकेशजी, आत्ताच याबद्दल काहीच सांगू शकत नाही. पुढे कसं काम होतंय ते बघू आणि ठरवू,”
सोशल मीडियावर ट्रोलर्सकडून ट्रोल
‘धुरंधर’ चित्रपटाला प्रचंड यश मिळाले असले तरी या चित्रपटाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ चित्रपटाला काही डायलॉग व सीनवरुन ट्रोल करण्यात आले होते. सोशल मीडियावर ‘धुरंधर’ची स्क्रिप्ट पंतप्रधानांच्या ऑफिसमधून आली होती का? असे प्रश्न ट्रोलर्सने विचारले होते. यावर अभिनेते राकेश बेदी यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.
पीएमओ ऑफिसमध्ये असा कोण व्यक्ती? – बेदी
ते म्हणाले, “असे डायलॉग कोण लिहून देणार आहे? जेव्हा चित्रपट हिट झाला तेव्हा काही लोकांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट पंतप्रधानांच्या ऑफिसमधून आल्याची टीका केली. पण मला सांगा, पीएमओ ऑफिसमध्ये असा कोण व्यक्ती आहे जो हे लिहून देऊ शकतो? असे करण्याचा कोणी विचारसुद्धा करणार नाही,”
धुरंधर चित्रपटाने गाजवले बॉक्स ऑफिस
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला. जबरदस्त गोष्ट, त्याचा खऱ्या घटनांशी संबंध आणि कलाकारांनी साकारलेली पात्र यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. रणवीर सिंहने साकारलेली भूमिका आणि अॅक्शन यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. प्रदर्शनानंतर पहिल्याच आठवड्यात ‘धुरंधर’ने शेकडो कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला. सॅकनिल्कनुसार, ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जगभरात १,८१३.३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘धुरंधर २’ने २०२६ मधील सर्वाधिक चर्चित आणि यशस्वी चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे.
