Vicky Kaushal Praises Ranveer Singh : आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘धुरंधर २’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं थिएटरमध्ये गर्दी करीत आहेत. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटानं कोट्यवधींचं कलेक्शन केलं आहे. परदेशातही ‘धुरंधर २’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर २’चं अनेक जण कौतुक करत आहेत. रणवीरच्या चाहत्यांना चित्रपटातील त्याचं काम खूपच आवडलं असून, सोशल मीडियावर सध्या रणवीर अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. तर चित्रपटातील त्याचे संवाद, सीन सर्व व्हायरल होत आहेत. फक्त त्याचे चाहतेच नव्हे, तर मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींनासुद्धा अभिनेत्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात आवडलं आहे. आतापर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्याचं कौतुक केलं. अशातच आता बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता विकी कौशलनंही ‘धुरंधर २’मधील रणवीरच्या कामाचं कौतुक केल आहे.

विकी कौशल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि अनेकदा त्याला आवडलेल्या, तसेच त्याच्या कलाकार मित्रांच्या चित्रपटांचं तो कौतुक करत असतो. अशातच आता विकीनं ‘धुरंधर २’ पाहिल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया दिली आहे. विकीनं यापूर्वीसुद्धा ‘धुरंधर’चं कौतुक केलं होतं. ‘धुरंधर २’चा टीझर रिलीज झाल्यानंतर त्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो शेअरही केला होता. आता अखेर चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतर त्यानं त्याबद्दलची त्याची प्रतिक्रिया कळवली आहे.

Award Banner

विकी कौशलनं केलं ‘धुरंधर २’चं कौतुक

विकी कोशलनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत रणवीर, आर. माधवन, आदित्य धर, राकेश बेदी या सर्वाचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यानं रणवीरच्या फिटनेसमुळे तो प्रभावीत झाल्याचंही म्हटलं आहे. विकी या पोस्टमधून आधी दिग्दर्शक आदित्य धरचं कौतुक करत म्हणाला, “आदित्य धर तुझा मला खूप अभिमान वाटतो आणि तुझ्या कामामुळे मी खूप प्रभावीत झालो आहे. प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणे तू हा चित्रपट बनवला आहेस. चित्रपटाला मिळत असलेल्या यशाच्या प्रत्येक क्षणासाठी तू पात्र आहेत. अभिनंदन भाऊ.”

विकी पुढे चित्रपटातील मुख्य अभिनेता रणवीरचं कौतुक करत म्हणाला, “तू मला प्रेरणा दिली आहेस. तुझा फिटनेस आणि कलाकार म्हणून तुझा वावर कमाल आहे.” पुढे ‘धुरंधर २’मधील इतर कलाकारांबद्दल विकी म्हणाला, “आर. माधवन तुम्हाला स्क्रीनवर पाहताना मजा आली. राकेश बेदी तुम्ही कमाल आहात.”

विकी कौशलची इन्स्टाग्राम स्टोरी

विकीनं पुढे चित्रपटाच्या एडिटिंगचं, एडिटरचं आणि निर्मात्यांसह इतर सदस्यांचंही कौतुक केलं आहे. शेवटी त्यानं चित्रपटातील प्रत्येक डिपार्टमेंटमधील सदस्यांबद्दल “तुम्ही सगळे ‘धुरंधर’ आहात”, असं म्हटलं आहे.