Dhurandhar Collection Day 1: रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच ‘धुरंधर’ने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाला समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत असूनही, त्याने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. कोणताही चित्रपट रिलीज झाल्यावर त्याची पहिल्या दिवसाची कमाई महत्त्वाची मानली जाते. आदित्य धरने दिग्दर्शित केलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले ते जाणून घेऊया.

‘धुरंधर’ने या वर्षीच्या अनेक हिट चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. शुक्रवारी या चित्रपटाबरोबर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, त्याचा मोठा फायदा धुरंधरला झाला आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी रणवीरच्या चित्रपटाशी स्पर्धा करण्यासाठी दुसरा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पहिल्या दिवसाच्या आकडेवारीवरून असं दिसतंय की धुरंधर लवकरच या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरू शकतो.

धुरंधरचे कलेक्शन

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, धुरंधरने पहिल्या दिवशी २१.७७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. अधिकृत आकडेवारी आल्यावर कमाईचा हा आकडा थोडा वाढण्याची शक्यता आहे. एकूणच, जवळपास २२ कोटींची ओपनिंग एका चित्रपटासाठी चांगली मानली जाते. वीकेंडला कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

धुरंधरचे बजेट व कलाकार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘धुरंधर’ चे एकूण बजेट अंदाजे २८० कोटी रुपये आहे. यापैकी २५० कोटी रुपये निर्मितीवर खर्च करण्यात आले असून, ३० कोटी रुपये प्रमोशन आणि मार्केटिंगवर खर्च केले आहेत. धुरंधरमध्ये सारा अर्जुन, संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल हे कलाकार आहेत.

‘धुरंधर’ने या चित्रपटांना टाकलं मागे

रणवीर सिंहच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. धुरंधरने दमदार कमाई करत खाली दिलेल्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकलं आहे.

दे दे प्यार दे – ९.४५ कोटी
जात – ९.६२ कोटी
सनी संस्कार की तुलसी कुमारी – १०.११ कोटी
एक दीवाने की दिवानियात – १०.१० कोटी
सितारे जमीन पर – १०.७० कोटी
सन ऑफ सरदार – ७.२५ कोटी
परम सुंदरी – ७.३७ कोटी
केसरी चॅप्टर २ – ७.८४ कोटी

धुरंधरच्या कमाईवर वादांचा फारसा परिणाम झाला नाही. जर बॉक्स ऑफिसवर चित्रपट या वेगाने कमाई करत राहिला तर तो लवकरच १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल.