Ranveer Singh : ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या चित्रपटांमुळे रणवीर सिंह प्रचंड चर्चेत आला. त्याच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. यातील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. पण, जगभरात कोट्यवधींची कमाई करत अनेक रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या या चित्रपटासाठी त्याने कमी मानधन घेतलं होतं असं निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी सांगितलं आहे.
ज्योती देशपांडे यांनी सांगितलं की रणवीर सिंह व दिग्दर्शक आदित्य धर यांनी कमी मानधनाचा करार केला होता आणि चित्रपटाला होणाऱ्या नफ्यातून भागेदारी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जर चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली नसती तर कदाचित दोघांनाही ठरलेली रक्कमच मिळाली असती. ज्योती देशपांडे यांनी यांनी ET डिजीटलशी संवाद साधताना सांगितलं की, या करारामुळे चित्रपटाशी संबंधित जोखीम आणि नफा या दोन्ही गोष्टी क्रिएटिव्ह पार्टनर्समध्ये वाटून घेता आल्या. त्यांनी पुढे सांगितलं की, ‘धुरंधर’ हा चित्रपट सुरुवातीला फ्रँचायझी म्हणून बनवण्याचा विचार नव्हता. त्याची कथा, बजेट आणि संपूर्ण नियोजन एका चित्रपटासाठीच करण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्याचे दोन भाग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चित्रपटाचा खर्चही जवळपास दुप्पट झाला.
ज्योती देशपांडे काय म्हणाल्या?
रणवीरबद्दल त्या पुढे म्हणाल्या, “धुरंधर चित्रपटासाठी रणवीर सिंहने कमी मानधन घेतलं होतं. त्याबरोबर त्याने चित्रपटाच्या नफ्यातील वाटा घेण्याचा करार केला होता. त्यामुळे चित्रपटाला यश मिळाल्यानंतर त्याला याचा मोठा फायदा झाला. दिग्दर्शक आदित्य धरनेही कमी निश्चित मानधन स्वीकारले होते आणि नफ्यात भागीदारीचा पर्याय निवडला होता.”
ज्योती देशपांडे यांनी सांगितलं की, “धुरंधर’ची कथा सुरुवातीला त्यांना आकर्षित वाटण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे ती पूर्णपणे पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित होती. सर्वसामान्य प्रेक्षकांना ही गुंतागुंतीची संकल्पना समजावून सांगणं आणि त्याच वेळी पारंपरिक चौकटी मोडून वेगळ्या पद्धतीने कथा मांडणं हे या चित्रपटासमोरील मोठं आव्हान होतं.” ‘धुरंधर’चा पहिला भाग गेल्या वर्षी ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात १,३५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.
त्यानंतर १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या दुसऱ्या भागानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत १,८०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांची एकत्रित जागतिक कमाई ३,१०० कोटी रुपयांच्या पुढे गेली.
