Ranveer Singh Dhurandhar Box Office Collection Japan Updates: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला असला, तरी जपानमध्ये मात्र या चित्रपटाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. फ्रँचायझीच्या दोन्ही भागांनी मिळून जगभरात तब्बल ३,१०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे, मात्र १० जुलै रोजी जपानमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवशी ८० स्क्रीन्सवर केवळ ९०० प्रेक्षक लाभले. जपानमधील जोरदार प्रमोशननंतरही हा ॲक्शन ड्रामा चित्रपट पहिल्या वीकेंडला टॉप २५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही. इतकेच नव्हे तर, सलमान खानच्या ‘टायगर ३’ चा १,३०० प्रेक्षकांचा रेकॉर्ड मोडण्यातही आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट अपयशी ठरला आहे.
‘धुरंधर’ला पहिल्या दिवशी मिळाले फक्त ९०० प्रेक्षक
ॲक्शन ड्रामा चित्रपट ‘धुरंधर’ १० जुलै रोजी जपानमध्ये ८० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, ट्रेड रिपोर्टनुसार, हा चित्रपट शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवसांत जपानमधील टॉप २५ चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळवू शकला नाही. रिलीजच्या पहिल्या दिवशी, दुपारी २ वाजेपर्यंत ५७ ठिकाणी धुरंधरची फक्त ४४९ तिकिटं विकली गेली होती. दुपारनंतर देखील कमाईत फारशी सुधारणा झाली नाही आणि ८० ठिकाणांवरील एकूण प्रेक्षकांची संख्या फक्त ९०० पर्यंतच पोहोचू शकली. जपानमधील प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते, तरीही चित्रपट तिथे चांगली कामगिरी करू शकला नाही.
जपानमध्ये ‘RRR’ सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट
‘धुरंधर’ने तीन दिवस निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे जपानमध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक प्रेक्षक मिळवणाऱ्या टॉप १० भारतीय चित्रपटांच्या यादीत तो स्थान मिळवू शकला नाही. या यादीत प्रवेश करण्यासाठी ‘धुरंधर’ला सलमान खानच्या ‘टायगर ३’ चा १,३०० प्रेक्षकांचा रेकॉर्ड मोडावा लागला असता. सध्या ‘टायगर ३’ या यादीत १० व्या स्थानावर आहे, मात्र रणवीर सिंहचा चित्रपट हा टप्पा पार करू शकला नाही. याआधी ‘पुष्पा २’ चित्रपटही टॉप १० च्या यादीत स्थान मिळवू शकला नव्हता.
सध्या जपानमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक ८,२३० प्रेक्षक मिळवण्याचा विक्रम एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाच्या नावावर आहे.
१. RRR – ८,२३० प्रेक्षक
२. साहो – ६,५१० प्रेक्षक
३. कल्की २८९८ एडी – ३,७०० प्रेक्षक
४. पठाण – २,२२० प्रेक्षक
५. सालार – २,२०० प्रेक्षक
६. जवान – १,९६० प्रेक्षक
७. रंगस्थलम – १,६१० प्रेक्षक
८. देवरा – १,५५० प्रेक्षक
९. बाहुबली २ – १,३८० प्रेक्षक
१०. टायगर ३ – १,३०० प्रेक्षक
‘धुरंधर’चे भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘धुरंधर’ चित्रपटाला भारतात प्रचंड यश मिळालं. या फ्रँचायझीमधील दुसरा चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटानंतर भारतातील आतापर्यंतचा दुसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल १,८१३ कोटींची कमाई केली आहे.
या फ्रँचायझीमधील पहिला चित्रपट ‘धुरंधर’ डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता, आणि तो देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. या पहिल्या भागाने जगभरात १,३०७ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. दोन्ही चित्रपटांनी मिळून जगभरात ३,१०० कोटींहून जास्त कलेक्शन केले.
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पांडोर आणि इतर अनेक कलाकारांची मांदियाळी आहे.
