Ranveer Singh Dhurandhar New Record : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन आता जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सर्वच रेकॉर्ड्स मोडले आहेत. अशातच आता ‘धुरंधर’च्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये अजूनही कायम आहे. नुकताच हा चित्रपट ओटीटीवरसुद्धा रिलीज झाला आहे. कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडल्यानंतर आता ‘धुरंधर’ने आणखी एक रेकॉर्ड केला आहे, तो म्हणजे तिकीटबारीवर टिकून राहण्याचा रेकॉर्ड.

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’चा आणखी एक रेकॉर्ड

रिलीज झाल्याच्या दोन महिन्यांनंतरही रणवीरचा ‘धुरंधर’ तिकीट खिडकीवर टिकून आहे. सिनेमाच्या रिलीजनंतर तो ऑनलाईन तिकीट प्लॅटफॉर्म BookMyShow वर सतत ट्रेंड करत आहे. त्यामुळे ‘धुरंधर’ BookMyShow वर सर्वात जास्त काळ ट्रेंड करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

याआधी विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाच्या नावावर हा रेकॉर्ड होता. विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट BookMyShow वर एकूण ५८ दिवस होता. हाच रेकॉर्ड आता ‘धुरंधर’ने मोडला आहे. ‘धुरंधर’ने शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’सारख्या सिनेमांनासुद्धा मागे टाकलं आहे.

‘धुरंधर’ने जागतिक स्तरावर १,३५० कोटींची कमाई केली. कोणत्याही हिंदी सिनेमासाठी ही मोठी गोष्ट आहे. थिएटर्समध्ये रिलीज झाल्यानंतर आठ आठवड्यांनी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. ओटीटीवरदेखील प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. भारतातच नव्हे; तर पाकिस्तानातसुद्धा हा चित्रपट ट्रेंडिंगमध्ये होता.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अर्जुन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा टीझर

या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धुरंधर: द रिव्हेंज’ येत्या १९ मार्च रोजी रिलीज होणार आहे. कही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर समोर आला. या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा सिक्वेल प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.