Ranveer Singh FIR : रणवीर सिंहने काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI Goa) ‘कांतारा चॅप्टर १’मधील ऋषभ शेट्टींच्या भूमिकेची नक्कल केली होती. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर खूप टीका झाली होती. त्या घटनेनंतर काही दिवसांतच रणवीर सिंहने माफीही मागितली होती. मात्र, या प्रकरणी अभिनेत्याच्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. आता धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

वकील प्रशांत मेथल यांनी प्रथम अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी (ACJM) न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत रणवीरने एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘कांतारा चॅप्टर १’मधील ऋषभ शेट्टीच्या भूमिकेची नक्कल केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही तक्रार हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आली असून, पोलिसांनी बुधवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६, २९९ व ३०२ अंतर्गत रणवीरविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

IFFI गोव्यात रणवीर सिंह अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांच्याशी मंचावर संवाद साधताना दिसला होता. त्यावेळी त्याने ऋषभ शेट्टी यांच्या ‘कांतारा : चॅप्टर १’ (२०२४) या चित्रपटातील अभिनयाचे कौतुक केले. मात्र तक्रारीनुसार, ऋषभ शेट्टी यांनी नकार दिला असतानाही रणवीरने चित्रपटातील ‘दैव’ची नक्कल केली होती.

तक्रारदाराने आरोप केला आहे की, रणवीरने पवित्र दैव परंपरेची थट्टा केली आणि दैवाला ‘Female Ghost’ म्हणून संबोधलं होतं. रणवीरची ही कृती भक्तांच्या धार्मिक भावना दुखावू शकते, याची त्याला जाणीव होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराला या घटनेची माहिती २ डिसेंबर २०२५ रोजी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यानंतर रणवीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत या प्रकरणावर माफी मागितली. त्याने लिहिले होते, “माझा हेतू फक्त ऋषभच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक करण्याचा होता. एक अभिनेता म्हणून मला माहीत आहे की, तो सीन अशा पद्धतीने साकारणे किती कठीण आहे आणि त्याबद्दल मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे. मी आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा नेहमीच सन्मान करतो; पण जर माझ्या कृतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो.”

त्यावर अद्याप रणवीरकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, त्याचा ‘धुरंधर’ सिनेमा अजूनही चर्चेत आहे. त्याच्या या सिनेमाने कमाईचे अनेक् रेकॉर्ड्स मोडले आहेत. ‘धुरंधर’ हा आतापर्यंतचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. येत्या १९ मार्च रोजी या चित्रपटाचा पुढचा भाग ‘धुरंधर २’ प्रदर्शित होणार आहे.