५ एप्रिल रोजी मुंबईत ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ झाले. त्यानिमित्ताने, २०११ मधील स्क्रीन अवॉर्ड्सच्या एका अविस्मरणीय आठवणीला उजाळा देऊया. १७ व्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये रणवीर सिंगच्या करिअरमधील एक महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला होता. ‘बँड बाजा बारात’ या पदार्पणातील चित्रपटासाठी ‘मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर’ हा पुरस्कार स्वीकारताना रणवीरला आपले अश्रू अनावर झाले होते.

रणवीर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेला, तेव्हा तिथे करण जोहर, शाहरुख खान आणि शाहिद कपूर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना भावुक झालेला रणवीर म्हणाला, “मला माफ करा, पण हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी लहानपणापासून अभिनेता व्हायचं स्वप्न पाहिलं होतं आणि आज या दिग्गज मंडळींसोबत मंच शेअर करताना मला स्वप्नवत वाटत आहे. आदि सर, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. हा पुरस्कार ‘बँड बाजा बारात’च्या टीमसाठी आहे. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी खूप खास आहात.” रणवीरचं हे बोलणं ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेला सलमान खानही भावूक झाल्याचं दिसून आलं.

रणवीर पुढे म्हणालेला, “आई, बाबा आणि माझी लाडकी बहीण रितिका—मी जे काही करतो ते फक्त तुम्हाला अभिमान वाटवा म्हणूनच करतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी तुम्हाला वचन देतो की, भविष्यात मी अजून खूप चांगलं काम करेन.”

रणवीर सिंगचा व्हिडीओ पाहा

रणवीर सिंग आपलं भाषण संपवून मंचावरून खाली उतरू लागला असतानाच शाहरुख खानने त्याला थांबवलं. आपल्या मिश्किल शैलीत शाहरुखने वातावरण हलकं-फुलकं केलं आणि रणवीरच्या येण्याने चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांवर काय परिणाम होईल, याबद्दल गंमत केली.

शाहरुख म्हणाला, “कुठे चालला आहेस? का रडतोय? आता आम्हाला तुझी गरज आहे. तू इंडस्ट्रीत आल्यावर आता आमचं काय होणार? इकडे ये, आम्हाला मिठी मार, तुझे प्रेम व्यक्त कर. तू खूप चांगला आणि देखणा अभिनेता आहेस.”

शाहरुख नंतर प्रेक्षकांना आवाहन करत म्हणाला, “मंडळी, रणवीरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तो आताच्या काळातील सर्वात गुणी अभिनेत्यांपैकी एक आहे.”

हसत हसत शाहरुख पुढे म्हणाला, “मित्रा, माझी एक इच्छा आहे, ती प्लीज पूर्ण कर. शाहिद कपूर आणि करण जोहर सुद्धा हेच विचारत होते. आम्ही बॅकस्टेजला चर्चा करत होतो… आम्हाला प्लीज ‘ऐंवी ऐंवी’ गाण्याची हुक स्टेप आम्हाला शिकव.” यानंतर सर्व कलाकारांनी रणवीरला फॉलो करत त्याच्या ‘बँड बाजा बारात’ या पहिल्या चित्रपटातील प्रसिद्ध डान्स स्टेप्स केल्या.