Ranveer Singh Injured On Dhurandhar 2 Set : सध्या सर्वत्र ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षक आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांकडून सिनेमाचे भरभरून कौतुक होत आहे. या कौतुकामागे सिनेमातील कलाकारांची अपार मेहनत आहे.

‘धुरंधर: द रिव्हेंज’ या सिनेमात अनेक ॲक्शन सीन्स आहेत आणि या ॲक्शन सीनसाठी प्रत्येकानेच मेहनत घेतली आहे. ॲक्शन सीन्स करताना सेटवर काही कलाकार जखमीसुद्धा झाले. सहाय्यक कलाकारच नव्हे; तर मुख्य अभिनेता रणवीर सिंहलासुद्धा दुखापत झाली होती. याबद्दल सिनेमातल्या एका अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे.

या चित्रपटातील अभिनेता गुरसेवक सिंहने शूटिंगदरम्यान घडलेल्या एका अपघाताची आठवण शेअर केली आहे. अमृतसरमधील एके ठिकाणी ॲक्शन सीनचे चित्रीकरण सुरू होते. हा सीन खूप तांत्रिक होता आणि त्यामध्ये वेळेचे गणित अचूक असणे खूप महत्त्वाचे होते. मात्र, याचदरम्यान एक अपघात घडला, ज्यात गुरसेवक जखमी झालाच, पण रणवीरच्या हातालासुद्धा लागलं. नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊ…

रणवीर सिंह माझ्या अंगावर कोसळला अन्…

गुरसेवक म्हणाला, “रणवीर सिंह माणूस म्हणून इतका प्रेमळ आणि कलाकार म्हणून इतका भारी का आहे? यामागची एक खास आठवण मी तुम्हाला सांगतो. आम्ही अमृतसरमध्ये एका ॲक्शन सीनचं शूटिंग करत होतो. या सीनमध्ये मी रणवीरच्या मागे होतो. माझ्याकडे एक बॉम्ब होता, जो मला पुढे जाऊन सेट करायचा होता. त्यानंतर ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला जाऊन मला स्वतःचा बचाव करायचा होता आणि ॲक्शन मास्टरजींच्या सूचनेनुसार रणवीर मला कव्हर करणार होता. आम्ही याची खूप रिहर्सल केली होती आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण शूटिंगच्या वेळी माझ्याकडून नकळत एक चूक झाली आणि बॉम्ब सेट करायला दोन सेकंद जास्त लागले. मी तिथून निघालोच होतो, इतक्यात मी आणि रणवीर एकमेकांना धडकलो. जणू एखादी गाडी ७०च्या स्पीडने येऊन मला धडकली आहे. मी टायरमध्ये जाऊन पडलो आणि रणवीर माझ्या अंगावर कोसळला. त्याची बंदूक माझ्या पोटाला लागली आणि माझ्या बंदुकीची नळी त्याच्या कोपराला लागली. यामुळे रणवीरला दुखापत झाली होती. पण मी मात्र बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून होतो. मला स्वतःपेक्षा त्याला जास्त लागलं असेल का, याची भीती वाटत होती.”

“माझी चूक होती” म्हणत मी माफी मागितली

यापुढे तो म्हणाला, “संपूर्ण टीम रणवीरच्या मागे धावली. साधारण १५ सेकंदांनंतर टीमला लक्षात आलं की, मीसुद्धा तिथेच पडलोय. डॉक्टरांनी मला तपासलं आणि सांगितलं की पोटाला दुखापत झाली आहे आणि तिथे सूजही आली आहे. तेवढ्यात दिग्दर्शक आदित्य धर सर तिथे आले. त्यांनी मला धीर दिला आणि म्हणाले, “ॲक्शन सीनमध्ये असं होत असतं, तू घाबरू नकोस.” मी त्यांना सांगितलं की रणवीरलाही लागलं आहे. त्यावर ते म्हणाले, “काही हरकत नाही, हा शूटिंगचा भाग आहे. तू आराम कर,” आणि त्यांनी डॉक्टरांना माझी नीट काळजी घ्यायला सांगितली. जेव्हा ही गोष्ट रणवीरला समजली, तेव्हा ते स्वतः माझ्याकडे आlला. मी आधीच “सर सॉरी, माझी चूक होती” म्हणत त्याची माफी मागितली. एकीकडे भीती आणि दुसरीकडे वेदना, यामुळे मला रडू कोसळलं होतं. पण रणवीरने एका मिनिटात माझं टेन्शन घालवलं. तो म्हणाला, “गुरसेवक काही हरकत नाही” आणि त्याने मला मिठी मारली. आम्ही साधारण एक मिनिट तसेच उभे होतो. त्यांच्या त्या प्रेमामुळे माझे डोळे भरून आले.”

“शूटिंगच्या तिसऱ्या दिवशी ही घटना घडली”

“पुढे रणवीरने माझी जखम पाहिली आणि विचारलं, “तू शूट करू शकशील की तुला ब्रेक हवाय?” त्यांच्या या शब्दांमुळे मलाही हिंमत आली. मी म्हणालो, “हा शेवटचाच सीन आहे, जर तू करू शकतोस तर मी ही नक्कीच करेन.” मी त्याला विचारलं, “सर, तुला किती लागलंय?” त्यावर तो म्हणाला, “कोपराला लागलंय, व्यायाम करताना थोडा त्रास होईल, पण काही हरकत नाही. चल, आपण सीन पूर्ण करूया.” त्यानंतर आम्ही तो सीन व्यवस्थित पूर्ण केला. शूटिंगच्या तिसऱ्या दिवशी ही घटना घडली होती, त्यानंतर आम्ही सलग ३५ दिवस एकत्र काम केलं”, असं गुरसेवक म्हणाला.

शेवटी गुरसेवक रणवीरचे कौतुक करत म्हणाला, “त्या दिवसापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत, रणवीरने मला कधीही असं जाणवू दिलं नाही की माझ्याकडून कोणती चूक झाली आहे. यालाच म्हणतात माणुसकी… प्रेम… आणि एकमेकांची काळजी घेणं. माझ्या मते, याच कारणामुळे तो आज एक मोठा स्टार आहे. चांगल्या लोकांमुळेच हे जग चालतं.”