Shefali Shah praises Ranveer Singh : ५ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यापूर्वी, अभिनेत्री शेफाली शाहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने २०१६ मधील स्क्रीन अवॉर्ड्स सोहळ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळी तिला झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ (२०१५) या चित्रपटासाठी ‘बेस्ट एन्सेम्बल कास्ट’ हा पुरस्कार मिळाला होता. यावेळी तिचा सह-कलाकार रणवीर सिंह तिच्याबरोबर होता, त्याने चित्रपटात तिच्या मुलाची भूमिका साकारली होती.

व्हिडीओमध्ये दिसतं की, होस्ट करण जोहर आणि कपिल शर्मा यांनी विजेत्यांची घोषणा केल्यानंतर रणवीर शेफालीला मंचावर घेऊन जातो. चित्रपटातील ‘गल्ला गुडिया’ या लोकप्रिय गाण्यावर रणवीरने शेफालीला भांगडा करण्याची विनंती केली, तेव्हा शेफाली त्याच्या कानात काहीतरी पुटपुटली. त्यानंतर रणवीरने अचानक शेफालीला उचलून घेतलं आणि तो मंचावर फिरू लागला, ज्यामुळे शेफालीला आश्चर्याचा धक्का बसला. प्रेक्षकांमध्ये बसलेली रणवीरची पत्नी, दीपिका पदुकोण, रणवीरची ही मस्ती पाहून हसत टाळ्या वाजवत होती.

रणवीर सिंह व शेफाली शाहची पहिली भेट

‘दिल धडकने दो’च्या शूटिंगपूर्वी तिची रणवीरबरोबरची पहिली भेटही अगदी अशीच होती, असं शेफालीने सांगितलं. “मी मुंबईतील एका स्टुडिओमध्ये ‘गल्ला गुडिया’ गाण्याच्या डान्स रिहर्सलसाठी गेले होते. सर्व कलाकार तिथे येत होते आणि मी एका कोपऱ्यात शांतपणे उभी राहून सर्वांकडे पाहून स्मितहास्य करत होते. इतक्यात मागून कुणीतरी अचानक मला उचलून घेतलं. मला राग येणार इतक्यात उत्साहाने कुणीतरी म्हटलं, ‘शेफू, आपण एक जबरदस्त चित्रपट बनवूया!’… तो रणवीर होता. ही आमची पहिलीच भेट होती आणि त्यानंतर आम्ही एक टीम बनलो. तो असाच आहे आणि म्हणूनच मला तो खूप आवडतो. तो मनात काहीही ठेवत नाही. भावना अनुभवण्याची आणि त्या व्यक्त करण्याची त्याची पद्धत अगदी लहान मुलांसारखी निरागस आहे,” असं शेफाली शाहने म्हटलं होतं.

Award Banner

रणवीरला प्रेमाने ‘या’ नावाने हाक मारते शेफाली

शेफाली शाह पुढे म्हणाली, “त्याची ऊर्जा, उत्साह आणि आपुलकी मनाला भावते. लोकांविषयी आणि तो करत असलेल्या प्रत्येक कामाविषयी असलेली त्याची ओढ अफाट आहे. मी त्याला प्रेमाने ‘रण’ अशी हाक मारते. तो समोरच्या व्यक्तीला खूप महत्त्व देतो, जे पाहून मनाला खूप छान वाटतं. तो खऱ्या अर्थाने एक ‘टीम प्लेयर’ आहे. त्याला प्रत्येक पात्राचे महत्त्व ठाऊक आहे. एखाद्या सीनमध्ये कधी मागे राहून दुसऱ्याला साथ द्यायची, हे त्याला चांगलं समजतं. यासाठी खूप आत्मविश्वास लागतो आणि चित्रपट हा टीमचा प्रयत्न असतो, केवळ वैयक्तिक नाही, हे त्याला समजलंय.”

रणवीर सिंहच्या कौतुक करण्याच्या पद्धतीबद्दल शेफाली म्हणाली…

‘दिल धडकने दो’ प्रदर्शित झाल्यानंतर रणवीर सिंह लपून चित्रपटगृहांमध्ये गेला होता आणि शेफालीच्या कामाचं त्याने भरभरून कौतुक केलं होतं. शेफाली म्हणते, “त्याने केलेलं कौतुक असो किंवा त्याच्याबद्दलची कोणतीही गोष्ट असो, ती कधीच लिमिटेड नसते. तो फक्त औपचारिकता म्हणून बोलत नाही. तो मनापासून बोलतो. एक व्यक्ती आणि अभिनेता म्हणून तो खूप भावूक आहे आणि आपल्या भावना अगदी मोकळेपणाने व्यक्त करतो,” असं शेफाली शाह म्हणाली होती.

रणवीरने साकारलेल्या भूमिकांचा उल्लेख करत शेफालीने केलं कौतुक

शेफालीने रणवीरच्या अभिनयाचंही कौतुक केलं. ती म्हणाली, “जर तो एखाद्या चित्रपटात किंवा अगदी जाहिरातीतही असेल, तर मी ती केवळ त्याच्यासाठी पाहते. तो सध्याच्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्याचे हे सातत्य थक्क करणारे आहे. त्याचा अभिनय खूप उत्तम असतो. तो अत्यंत सहज आणि नैसर्गिक वाटतो, हीच त्याची खासियत आहे. त्याचं काम पाहताना तुम्हाला अभिनेता रणवीर सिंह नाही, तर तो साकारत असलेलं पात्र दिसतं. तुम्हाला त्याच्या अभिनयात फक्त प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि नैसर्गिकपणा जाणवतो. समोर फक्त त्याचे पात्रच दिसते— मग ते बाजीराव असो, कपिल देव, खिलजी, जसकीरत किंवा हमजा,” असं शेफाली म्हणाली. तिने रणवीरच्या गाजलेल्या भूमिकांचा उल्लेख केला आणि कौतुक केलं.

“रणवीर म्हणजे शुद्ध मनाचा वेडा माणूस आहे. आणि हीच त्याची खरी ताकद आहे,” असं शेफाली पोस्टमध्ये शेवटी म्हणाली. या पोस्टवर रणवीरने प्रतिक्रिया दिली. “शेफू, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. तुझ्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे,” अशी कमेंट रणवीरने केली. त्यावर जे काही लिहिलंय ते मनापासून लिहिलंय, असं शेफाली रणवीरला म्हणाली.