Ranveer Singh’s Cameo In Shahrukh Khan & Deepika Padukone’s King : रणवीर सिंह हा ‘डॉन ३’ चित्रपटातील मुख्य अभिनेता असेल असं समजल्यापासून तो आणि शाहरुख खान एकत्र काम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण, त्यानंतर ‘धुरंधर’ फेम अभिनेती या फ्रँचायझीतून बाहेर पडल्याची बातमी समोर आल्यानंतर आता रणवीर सिंह आणि शाहरुख खान पुन्हा एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार रणवीर सिंह ‘किंग’ चित्रपटात काम करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही पोस्टनुसार, रणवीर या बहुचर्चित अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात खास भूमिकेत झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात त्याची बायको दीपिका पादुकोण महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. परंतु, याबद्दल कोणतीही अधिकृती घोषणा करण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावरील विविध पोस्टनुसार, रणवीर सिंहने ‘किंग’ चित्रपटासाठी खास सीनचं शूटिंग केल्याचा दावा केला जात आहे. हे शूटिंग जवळपास दोन आठवड्यांपूर्वी परदेशात झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, रणवीरच्या या प्रोजेक्टमधील सहभागाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण तो चित्रपटाच्या सेटवर दिसल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आला आहे.

रणवीर सिंह नुकताच ‘किंग’ चित्रपटाच्या सेटवर दिसला. सुरुवातीला तो त्याची बायको दीपिका पादुकोण आणि त्यांची एक वर्षांची मुलगी दुआसोबत तिथे गेला असावा, असं म्हटलं जात होतं. पण आता रणवीर या चित्रपटात काम करत असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चाहते रणवीर आणि शाहरुख खान यांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अलीकडील परदेशातील शूटिंगदरम्यान रणवीर चित्रपटाच्या टीमबरोबर फोटो काढताना देखील दिसला होता. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधान आलं आहे.

‘किंग’ चित्रपटाच्या एका फॅन पेजवरील पोस्टनुसार, रणवीर सिंहची भूमिका फक्त छोट्या कॅमिओपुरती मर्यादित नसू शकते. चर्चांनुसार, तो शाहरुखची लेक सुहाना खानला धोक्यातून मार्ग दाखवणाऱ्या एका रहस्यमय व्यक्तीची भूमिका साकारू शकतो. तसंच, कथेत महत्त्वाचा ट्विस्ट आणण्यासाठीही त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. हे खरं ठरल्यास, शाहरुख खानच्या मुलांबरोबर रणवीरचा हा दुसरा प्रोजेक्ट असेल. याआधी त्याने गेल्या वर्षी आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं होतं.