FWICE Withdraws non-cooperation directive on Ranveer Singh : बॉलीवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंहविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने (FWICE) असहकार निर्देश जारी केले होते. ‘डॉन ३’ सिनेमातून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. चित्रपटाचे शूटिंग तीन आठवड्यांवर आलेले असताना रणवीर सिंहने चित्रपट सोडल्यामुळे फरहान अख्तरने तक्रार केली होती. याबाबत अनेकदा चर्चेसाठी बोलावून न आल्यामुळे रणवीर सिंहवर FWICEने थेट बंदीची कारवाई केली, यावरून चित्रपटसृष्टीमध्ये जोरदार चर्चा झाल्यानंतर अखेर रणवीर सिंहवरील कारवाई मागे घेण्यात आली आहे.
अभिनेता रणवीर सिंहवरील बंदीचा निर्देश मागे घेण्यात येत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन’ (IMPAA), ‘प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ आणि ‘सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन’ (CINTAA) यांच्या मध्यस्थीनंतर बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. FWICEचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली.
‘असहकार’बाबतचा आदेश तात्काळ मागे
बी. एन. तिवारी म्हणाले की, “IMPAA, प्रोड्यूसर्स गिल्ड आणि CINTAA यांच्या विनंतीवरून, आम्ही आमचा ‘असहकार’बाबतचा आदेश तात्काळ मागे घेत आहोत. निर्मात्यांच्या संघटनेसोबत एकत्र बसून असा योग्य निर्णय घेण्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे. यामुळे निर्माते, दिग्दर्शक किंवा अभिनेते यांपैकी कोणालाही अडचणींचा सामना करावा लागणार नाही,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
अभिनेता रणवीर सिंहने देखील FWICE ला कायदेशीर नोटीस पाठवली होती. याबाबत बी. एन. तिवारी यांनी नमूद केले की, “या प्रकरणामध्ये कोणाचाही विजय किंवा पराभव झालेला नाही. आमच्या कायदेशीर विभागातर्फे त्यांच्या कायदेशीर नोटीसला योग्य ते उत्तर दिले जाईल.
धुरंधरमधील दोन्ही कलाकारांनी सोडले प्रोजेक्ट
‘प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने अधिकृत पत्र जारी करत भूमिका स्पष्ट केली होती. कोणत्याही कलाकाराचे स्पष्ट नाव न घेता निर्मिती संस्थांकडून आलेल्या तक्रारींचा उल्लेख केला होता. या पत्रामध्ये “एक्सेल एंटरटेनमेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ यांनी तक्रारी दाखल केल्याचे म्हणत सध्याच्या परिस्थितीवर भूमिका स्पष्ट केली. मुख्य शूटिंगच्या काही दिवस आधी कलाकारांनी प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याचे नमूद केले आहे. याचा थेट संबंध रणवीर सिंह याच्या ‘डॉन ३’मधून आणि अक्षय खन्ना याने ‘दृश्यम ३’ सोडल्याशी आहे, यामुळे चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेतील विश्वासाला आणि सन्मानाला धक्का पोहचतो, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
यामुळे चित्रपटसृष्टीतील एकी कमी होतीये – गिल्ड
गिल्डच्या या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, चित्रपटसृष्टीमध्ये कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ हे शेवटच्या क्षणी प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही एक चिंतेची बाब बनली असून यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. इतर विभागांना याचा फटका बसतो आणि शेकडो लोकांच्या कामांवर गदा येते. अशा वागणुकीमुळे चित्रपट निर्मितीमधील विश्वास, व्यावसायिकता आणि आदर यांना धक्का बसतो आहे. अशा घटनांमुळे चित्रपटाच्या ब्रँडबाबत आदर व विश्वाससुद्धा कमी होतो, यामुळे चित्रपटसृष्टीतील एकी कमी होत आहे. सर्वांनी आपापसातील वाद शांतपणे सोडवावेत आणि चित्रपटसृष्टीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन गिल्डने या पत्रातून केले आहे.
