Ranveer singh not playing lord shiva : बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेता रणवीर सिंह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्याच्या भूमिकेचे आणि अभिनयाचे चाहत्यांनी जोरदार कौतुक केले. ‘धुरंधर’च्या प्रचंड यशानंतर रणवीर सिंह कोणता चित्रपट करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. रणवीर ‘हमजा अली मजारी’ या दमदार भूमिकेनंतर भगवान महादेवाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. लेखक अमिश त्रिपाठी यांच्या ‘शिवा ट्रिलॉजी’वर आधारित पुस्तकांवर भव्य चित्रपट, मालिका तयार होत असून, त्यामध्ये रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असल्याची चर्चा होती. मात्र, अमिश त्रिपाठी यांनी यावर भाष्य करीत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

रणवीर सिंह महादेवाची भूमिका साकारणार नाही

लेखक अमिश त्रिपाठी यांच्या ‘शिवा ट्रिलॉजी’ मालिकेवर आधारित चित्रपटात रणवीर भगवान शंकराची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र, अमिश यांनी मंगळवारी हे दावे फेटाळून लावले आणि अमित त्रिपाठी यांनी स्पष्ट केले की, अभिनेता रणवीर सिंह या प्रकल्पाशी जोडलेला नाही. त्यामुळे अभिनेता रणवीर हा भगवान महादेवाची भूमिका साकारणार नसल्याचे स्पष्ट झाले. हा त्याच्या चाहत्यांसाठी धक्का असला तरी लेखक अमिश त्रिपाठी यांनी स्पष्टीकरण देत चर्चा थांबवल्या आहेत.

रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असल्याचा दावा

यापूर्वी ‘पिंकविला’मधील एका वृत्तात असा दावा करण्यात आला होता की, लेखक अमिश त्रिपाठी यांचा ‘द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ चित्रपट सध्या निर्मितीच्या टप्प्यावर असून, त्यामध्ये रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असणार आहे. रणवीरने त्याच्या ‘माँ कसम फिल्म्स’ या निर्मिती संस्थेंतर्गत ‘इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ मालिकेचे हक्क विकत घेतले आहेत. तसेच, या मालिकेचे एका भव्य ट्रिलॉजीमध्ये रूपांतर करण्यासाठी या अभिनेत्याने ‘बिर्ला स्टुडिओज’सोबत भागीदारी केल्याचेही वृत्तांत म्हटले होते. मात्र, लेखक अमिशने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

लेखक अमिश त्रिपाठी यांनी काय दिली प्रतिक्रिया?

‘द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’चे लेखक अमिश यांनी ‘व्हरायटी इंडिया’ला सांगितले, “शिवा ट्रिलॉजीचे हक्क माझ्याकडेच आहेत. आणि अद्याप कोणाशीही कोणताही करार केलेला नाही. अर्थातच, मला रणवीरबद्दल प्रचंड आदर आहे आणि मी त्याचा खूप मोठा चाहता आहे; परंतु ही बातमी खरी नाही,” अशा स्पष्ट शब्दांत लेखक अमिश त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

रणवीर सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

‘धुरंधर’ व ‘धुरंधर २’ या चित्रपटांच्या भव्य यशानंतर आदित्य धर पुन्हा एकदा रणवीर सिंहसह काम करण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर ‘प्रलय’ चित्रपटामध्ये रणवीर झळकणार आहे. दरम्यान, वैयक्तिक आयुष्यातही रणवीर सिंह लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन करणार आहे. दीपिका पादुकोण ही पुन्हा एकदा आई होणार असल्याने ही जोडी जोरदार चर्चेत आहे.