Ranveer Singh Pakistan Connection : रणवीर सिंह सध्या ‘धुरंधर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करत आहे. या चित्रपटात त्यानं हमझा अली हे पात्र साकारलं आहे. जो पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून राहत असतो. चित्रपटातील त्याच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. पण, तुम्हाला माहित आहे का खऱ्या आयष्यातसुद्धा रणवीरचं पाकिस्तानशी एक कनेक्शन आहे.
रणवीर सिंहचे आई-वडील जरी अभिनय क्षेत्रापासून दूर असले तरी त्याच्या घरातील एका व्यक्तीकडून त्याला हा अभिनयाचा वारसा मिळाला आहे आणि याच व्यक्तीचा पाकिस्तानशी थेट संबंध होता. रणवीरला कोणाकडून अभिनयाचा वारसा मिळाला आणि त्याचं पाकिस्तानशी कसं कनेक्शन आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
रणवीर सिंहचं पाकिस्तानशी आहे कनेक्शन
‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिवंगत अभिनेत्री चांद बर्क या रणवीर सिंहच्या आजी आहेत. चांद बर्क यांचे भाऊ सॅम्युअल मार्टिन बर्क भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानचे राजदूत बनले. पण, भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर चांदबर्ग या मुंबईत आल्या आणि अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केलं. २ फेब्रुवारी १९३२ मध्ये ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेल्या चांद बर्क ‘कहा गये’ चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी लाहोरमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या नृत्य शैलीमुळे त्यांना पंजाबची डान्सिंग लिली अशी ओळख मिळाली. यानंतर राज कपूर यांनी त्यांच्यातील गुण हेरून त्यांना ‘बूट पॉलिश’ या १९५४ मध्ये आलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. यामुळे हिंदी सिनेसृष्टीत त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. यानंतर चांद बर्क यांनी अनेक हिंदी व पंजाबी चित्रपटांत काम केलं. ज्यामध्ये ‘बसंत बहार’, ‘लजवंती’, ‘अदालत’, ‘श्रवण कुमार’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
चांद बर्क यांच्या खाजगी आयुष्यात आलेले उतार चढाव
चांद बर्क यांना खाजगी आयुष्यात कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. चांद बर्क यांनी फिल्ममेकर निरंजन यांच्याशी लग्न केलं होतं. परंतु, या दोघांनी पुढे जाऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि १९५४ मध्ये दोघे विभक्त झाले. यानंतर चांद यांनी पुढे जाऊन उद्योजक सुंदर सिंह भवनानी यांच्याशी लग्न केलं. सुंदर सिंह भवनानी त्यांचे पुत्र जगजीत सिंह भवनानी पुढे जाऊन यशस्वी उद्योजक झाले. जगजीत सिंह भवनानी रणवीर सिंहचे वडील आहेत. त्यामुळे चांद बर्क या नात्यानं रणवीर सिंहच्या आजी होत्या.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार २८ फेब्रुवारी २००८ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी चांद बर्क यांचं निधन झालं. परंतु त्यांच्यानंतर त्यांचा नातू रणवीर सिंह त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे.
