रणवीर सिंहने अनेकदा गोविंदाबद्दल बोलताना त्याचं कौतुक केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता गोविंदांचा रणवीरच्या अभिनयावर आणि व्यक्तिमत्त्वावरही मोठा प्रभाव राहिला आहे. गोविंदांचं कॉमिक टायमिंग, दमदार अभिनय आणि पडद्यावरील वावर रणवीरला त्याच्या लहानपणापासूनच खूप प्रभावित करत होता. गोविंदाच्या चित्रपटांपैकी १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘राजा बाबू’ हा रणवीर सिंहच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक असल्याचं त्याने म्हटलं होतं.
रणवीर सिंहला शाद अली दिग्दर्शित २०१४च्या ‘किल दिल’ या चित्रपटात गोविंदाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात अली जफर आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीरने गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव स्वप्न पूर्ण झाल्यासारखा असल्याचं सांगितलं होतं. ९०च्या दशकातील या सुपरस्टारबद्दलचं आपलं मत व्यक्त करताना रणवीरने चित्रपटातील गोविंदाच्या योगदानाचंही भरभरून कौतुक केलं.
मी गोविंदांचे चित्रपट ५०हून अधिक वेळा पाहिले आहेत – रणवीर
मिड डेच्या वृत्तानुसार रणवीर गोविंदाच्या चित्रपटांचं कौतुक करत म्हणालेला, “हा मनोरंजन करणारा चित्रपट आहे. यात कॉमेडी, रोमान्स, ड्रामा आणि अॅक्शनचा उत्तम मिलाफ आहे. गोविंदाजी हे दिग्गज कलाकार आहेत आणि हा चित्रपट पाहण्यामागचं एक प्रमुख कारणही तेच आहेत. ते खरोखरच अभिनयाचे मास्टर आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत खूपच ओल्ड स्कूल आहे. मी कदाचित त्यांच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे. मी त्यांचे काही चित्रपट ५० हून अधिक वेळा पाहिले आहेत. त्यांची सर्व गाणीही मी पाहिली आहेत. त्यांचे सगळेच चित्रपट मला आवडतात असं नाही, पण गोविंदा मला खूप आवडतात. ते आयकॉन आहेत.”

सध्या रणवीर सिंह आगामी प्रोजेक्टमधील दमदार लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच तो विमानतळावर स्पॉट झाला. मात्र, यावेळी त्याने आपला नवा लूक पूर्णपणे लपवून ठेवला होता, त्यामुळे त्याच्या नव्या लूकची झलक चाहत्यांना फारशी पाहायला मिळाली नाही. यावेळी तो सैल टी-शर्ट आणि बॅगी पँटमध्ये दिसला. त्याने बीनी, हटके सनग्लासेस आणि फेस मास्क घातल्याने त्याचा नवा लूक बऱ्याच अंशी लपलेला होता. रणवीर सिंह सध्या आगामी चित्रपट ‘प्रलय’साठी तयारी करत आहे.

दरम्यान, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी ८ सप्टेंबर रोजी त्यांची मुलगी दुआचा दुसरा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने या जोडप्याने सोशल मीडियावर काही हृदयस्पर्शी कौटुंबिक फोटो शेअर केले. दोघे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असून दीपिकाच्या मॅटर्निटी शूटमधील फोटोंमधून रणवीर व त्यांची लेक दुआनेही अनेकांचं लक्ष वेधलं.
