Ranveer singh in lord shiva role : रणवीर सिंह सिनेविश्वातील सुपरस्टार म्हणून यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंदर २’ ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर तो नव्या भव्य प्रकल्पासाठी सज्ज झाला आहे. ‘हमजा अली मजारी’ या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर रणवीर आता भगवान शिवाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
भगवान शिवच्या भूमिकेत रणवीर
लेखक अमिश त्रिपाठी यांच्या गाजलेल्या शिवा ट्रिलॉजीवर आधारित पुस्तकांवर भव्य चित्रपट मालिका तयार करण्यात येणार आहे. तीन भागांत साकारल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये रणवीर सिंह प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबत ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर रणवीरच्या हाती आणखी एक मोठा प्रकल्प लागल्याची चर्चा सुरु आहे. बिर्ला स्टुडिओ अंतर्गत हा चित्रपट तयार करण्यात येणार असून, रणवीर सिंहने या भूमिकेसाठी होकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
रणवीर सिंहची निर्मिती क्षेत्रात यशस्वी वाटचाल
जबरदस्त एनर्जीने चित्रपटासाठी अथक प्रयत्न घेणाऱ्या रणवीर सिंहकडे सध्या चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येत आहेत. ‘धुरंधर’ चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांनादेखील पुढील चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. रणवीरने ‘द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’चे हक्क मिळवले आहेत. तो त्याच्या ‘माँ कसम फिल्म्स’ या निर्मिती संस्थेंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. त्यामुळे अभिनयासह रणवीर सिंह निर्मिती क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणार आहे.
चित्रपटाचे शूटिंग कधी होणार सुरु?
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, लेखक अमिश त्रिपाठी यांचा ‘द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ चित्रपट सध्या निर्मितीच्या टप्प्यावर आहे. ही कथा चित्रपटाच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी रणवीर सिंह उत्सुक आहे. त्याने बिर्ला स्टुडिओसोबत हातमिळवणी करीत त्याचे हक्कदेखील मिळवले आहेत. चित्रपटाच्या कथेवर काम चालू असून, लेखन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे इतर भूमिका कोण करणार हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. तीन टप्प्यांमध्ये येणाऱ्या या चित्रपटात रणवीर सिंह प्रमुख भूमिका करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग २०२८ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
दीपिका आणि रणवीर पुन्हा होणार आई-बाबा
‘धुरंदर’ व ‘धुरंदर २’ या चित्रपटांच्या भव्य यशानंतर आदित्य धर पुन्हा एकदा रणवीर सिंहसह काम करण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर प्रलय या चित्रपटामध्ये रणवीर झळकणार असून, आता तो भगवान शंकराच्या प्रमुख भूमिकेतही काम करणार आहे. दरम्यान, रणवीर सिंहच्या वैयक्तिक आयुष्यातही लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. दीपिका पादुकोण ही पुन्हा एकदा आई होणार असल्याने ही जोडी जोरदार चर्चेत आहे.
