Ranveer Singh 3 Vanity Vans Viral Post : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर, प्रेक्षकांनी चित्रपटातील लहानसहान तपशील शोधण्यास सुरुवात केली. संवादांपासून ते अगदी शेवटच्या क्रेडिट्सपर्यंत सगळ्याच गोष्टींचं बारकाईनं विश्लेषण करण्यात आलं. याचदरम्यान रेडिटवर झालेल्या एका चर्चेत असा दावा करण्यात आला की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता रणवीर सिंहनं तीन व्हॅनिटी व्हॅन्स वापरल्या.
क्रेडिट्समधल्या या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. त्यामुळे बिग बजेट चित्रपटांमधील कलाकारांच्या खर्चावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हिंदुस्तान टाइम्सनं या दाव्याची चौकशी केली असता, प्रत्यक्षात या प्रकरणाचा अर्थ वेगळाच असल्याचं समोर आलं.
रणवीर सिंहने खरंच तीन व्हॅनिटी व्हॅन्स वापरल्या का?
‘धुरंधर’ चित्रपटाच्या शेवटच्या क्रेडिट्समध्ये रणवीरच्या तीन व्हॅनिटी व्हॅन्सचा उल्लेख असलेला स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्या क्रेडिट्समध्ये रणवीरच्या हम्झा या पात्रासाठी, (हम्झा व्हॅन, हम्झा स्टाफ व्हॅन व हम्झा नॉर्मल व्हॅन) असा उल्लेख होता. त्यामुळे निर्मितीवर जास्त खर्च झाल्याची चर्चा रंगली.
मात्र, चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित एका सूत्रानं हिंदुस्तान टाइम्सशी याबद्दलचा खुलासा केला. या खुलाशानुसार, क्रेडिट्समध्ये उल्लेख केलेली ‘व्हॅन’ म्हणजे व्हॅनिटी व्हॅन नव्हे, तर त्या साध्या गाड्या होत्या. या गाड्या थायलंडमधील शूटिंगदरम्यान वापरण्यात आल्या होत्या.
सूत्रांच्या मते, “बँकॉकमध्ये झालेल्या शूटिंग शेड्युलसाठी या व्हॅन्सचा वापर करण्यात आला होता. कलाकार, स्टाफ, सामान आणि इतर गरजेच्या गोष्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी या गाड्या वापरल्या गेल्या. प्रत्यक्षात रणवीरसाठी एक व्हॅनिटी व्हॅन आणि दोन साध्या गाड्या होत्या.”
बँकॉकमध्ये अनेकदा बाहेरच्या लोकेशन्सवरील शूटिंगमुळे सतत शहरभर प्रवास करावा लागत असल्यानं या व्हॅन्सचा वापर करण्यात आला होता. वाहतुकीचा हा खर्च टाळता येणं शक्य नव्हतं.
रणवीर सिंहच्या शूटिंग शेड्यूलमुळे स्टाफ आवश्यक
‘धुरंधर’ आणि त्याचा सीक्वेल ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी शूट करण्यात आले होते. सूत्रांनी सांगितलं की, रणवीरचं शूटिंग शेड्युल आणि त्याच्या शारीरिक बदलांमुळे त्याला सेटवर स्टाफची गरज होती.
They actually mentioned ranveer’s 3 vanity vans in the end credits of Dhurandhar ?
byu/basjeerahun inbollywoodcirclejerk
“टीझरमध्येही रणवीरच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आणि त्यातील मोठा बदल दिसतो. काही वेळा त्यानं काही महिन्यांत किंवा अगदी काही दिवसांत १५ किलो वजन कमी केलं आणि काही दिवसांत २५ किलो वजन वाढवलंही. तो दिवसाला १२ ते १४ तास शूट करत होता. अशा मोठ्या शारीरिक बदलांसाठी कधी कधी सेटवर जिम, खास स्वयंपाकी किंवा दोन्हींची गरज असते,” असंही सूत्रांनी स्पष्ट केलं. रणवीरला कोणतीही अतिरिक्त सुविधा देण्यात आलेली नव्हती, तर कामासाठी जे आवश्यक होतं तेवढंच त्याला दिलं गेलं, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरसह अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त व अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत . ‘धुरंधर’च्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातून त्याच्या पात्राची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. ‘धुरंधर २’ हा चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

