Badshah Second Marriage : रॅपर बादशाह त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. बादशाहच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बादशाह लग्नाचे विधी करताना दिसत आहे. बादशाहने गुपचूप दुसरं लग्न उरकलं आहे. त्याने जिच्याबरोबर लग्न केलं ती तरुणी कोण आहे, याबद्दल माहिती समोर आली आहे. बादशाहचे हे दुसरे लग्न असून पहिली पत्नी जास्मिनपासून तो २०२० मध्ये विभक्त झाला होता.

४० वर्षांच्या बादशाहचं नाव मध्यंतरी पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर बादशाहचं पंजाबी अभिनेत्री इशा रिखीशी अफेयर असल्याचं म्हटलं गेलं. मात्र त्यांनी अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाही. अशातच इशाबरोबरच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इशा रिखीच्या आईने केली पोस्ट

इशा रिखी हिची आई पूनम रिखीने इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत. व्हिडीओमध्ये बादशाह व इशा एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दोघांनाही नवीन प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.

Award Banner

पाहा बादशाहच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ

बादशाह व इशा दोघेही नवरदेव नवरीसारखे नटलेले दिसत आहेत. त्यांनी अत्यंत साधेपणाने लग्न केलं. लग्नाचा मोजकेच लोक उपस्थित होते. दोघांनी कुटुंबियांबरोबर फोटोदेखील काढले आहेत. बादशाह व इशाचे आणखी काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात इशा व बादशाह यांनी ट्विनिंग केलेले दिसत आहे. बादशाह व इशा या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

बादशाहचे पहिले लग्न व घटस्फोट

बादशाहने २०१२ मध्ये जास्मिन मसीहशी लग्न केलं होतं. हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले होते. जस्मिन ही मूळची ख्रिश्चन कुटुंबातील होती. २०१७ मध्ये त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव जेसेमी ग्रेसी सिंग असं आहे. २०१९ पासूनच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. २०२० मध्ये त्यांच्यातील वाद विकोपाला गेले आणि ते त्याच वर्षी कायदेशीररित्या विभक्त झाले. जास्मिन सध्या आपल्या मुलीबरोबर लंडनमध्ये राहतेय.