लोकप्रिय रॅपर बादशाह (Badshah Divorce) हा घटस्फोटित आहे. त्याच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीचं नाव जास्मिन मसिह असून ती लंडनमध्ये राहते. आता बादशाहने लग्न अयशस्वी ठरण्यामागचं कारण सांगितलं. सांस्कृतिक फरकांमुळे वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी आल्या, असं तो म्हणाला. या काळात पॅनिक अटॅक आले आणि त्यासाठी उपचार घ्यावे लागले असं बादशाहने सांगितलं. बादशाह व जास्मिन यांना जेसेमी नावाची मुलगी आहे. बादशाह व जास्मिनचं लग्न २०१२ मध्ये झालं होतं, २०१७ मध्ये त्यांना मुलगी झाली आणि २०२० मध्ये ते विभक्त झाले.

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत बादशाहला त्याचं लग्न आणि मुलीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला की त्याचा प्रेमावर खूप विश्वास आहे. “दोन तीन गोष्टींना आयुष्यात खूप महत्त्व द्यायला पाहिजे आणि त्या गोष्टी मन लावून करायला पाहिजे,” असं बादशाह म्हणाला. तू जास्मिनवर खूप प्रेम केलं होतंस का, असं विचारल्यावर तो म्हणाला, “होय, पण माझं हृदय तुटलं.”

दोनदा प्रेमविवाह, दोन्हीवेळा अपयश अन् पतींवर शारीरिक शोषणाचे आरोप; आता जुळ्या मुलींसह ‘अशी’ जगतेय अभिनेत्री

बादशाह-जास्मिनची ओळख कशी झाली?

“आमची ओळख फेसबुकवर झाली आणि नंतर एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून कनेक्ट झालो. आम्ही एक वर्षाहून जास्त काळ डेट केलं आणि नंतर लग्न केलं होतं,” असं बादशाहने सांगितलं. लग्नाला आई-वडिलांची मंजुरी होती का? असं विचारल्यावर तो हसत म्हणाला, “ते आमच्या लग्नासाठी तयार झाले, काहीच बोलले नाही.” त्यानंतर बादशाहने म्हटलं की लग्न केल्यावर ते निभावण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, दोन वेगळे लोक एकत्र कसे राहू शकतात, ते बघायला हवं. याबाबतीत आपले आई-वडील जे सांगतात ते बरोबर असतं. मला या लग्नाबद्दल खात्री आहे का, असं मला माझ्या आई-बाबांनी विचारलं होतं, असं त्याने नमूद केलं.

रॅपर बादशाह (फोटो – इन्स्टाग्राम)

लग्नात अडचणी का आल्या?

दोघांमधील सांस्कृतिक फरकामुळे खूप अडचणी आल्या असं बादशाहने सांगितलं. “तिचा जन्म लंडनमध्ये झाला, ती तिथेच वाढली. माझ्या पालकांना अंदाज होता की लग्नात अडचणी येणार आणि तेच झालं. ती इथल्या संस्कृतीशी जुळवून घेऊ शकली नाही आणि गोंधळली. पण आम्ही दोघांनीही त्यातून मार्ग काढण्यासाठी खूप प्रयत्न केले,” असं बादशाह म्हणाला. मुलीचं नाव जेसेमी आहे. हिब्रू भाषेत जास्मिनला जेसेमी म्हणतात. जास्मिन ख्रिश्चन आहे, असंही बादशाहने सांगितलं.

 दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

मुलीच्या संपर्कात असल्याचं बादशाहने सांगितलं. तसेच लग्न ही गोष्ट अपरिपक्व लोकांसाठी नाही, असं मत त्याने मांडलं. “आजच्या काळात लग्न ही एक सदोष संकल्पना आहे. यात काही सुधारणा करणं गरजेचं आहे, कारण यात खूप दडपण आहे. एखाद्याने परिपक्व झाल्यावर खूप विचार करून लग्न करायला हवं. लोक खूप लवकर लग्न करतात, अर्थात त्यामागेही बायोलॉजिकल कारणं आहेतच पण तरीही तुम्ही लग्नासाठी तयार असाल आणि तुम्हाला खात्री असेल तरच लग्न करा. नाहीतर तुम्ही लग्नसंस्थेचा अनादर करत आहात. स्वतःचं मत असलेल्या एक व्यक्तीबरोबर राहणं हे एक पूर्णवेळ काम आहे,” असं बादशाह म्हणाला.