आदित्य सरपोतदार दिग्दर्शित २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्या’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघ व अभिनेता अभय वर्मा मुख्य भूमिकेत झळकले होते. अशातच आता अभय वर्मा लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनच्या लेकीबरोबर झळकणार आहे
रवीना टंडनची लेक राशा थडानी हिने अजय देवगणच्या ‘आझाद’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील गाण्यांमधील तिच्या नृत्याने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. अशातच आता राशा अभय वर्मासह एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच राशाने इन्स्टाग्रामवर अभय वर्माबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ते एकमेकांसह व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसले व त्यादरम्यान त्यांनी एकमेकांना आपण तयार आहोत, पण ११ जूनसाठी हे लोक तयार आहेत का? असं म्हटलं होतं. ‘मुंज्या’ आणि ‘आझाद’नंतर हे दोघे आता एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचं नावही ठरलं आहे.
अभय व राशा मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाचं नाव ‘लाईके लाईका’ (Laikey Laikaa) असं आहे. ११ जूनला सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये राशा व अभय आम्ही काहीतरी खास करणार आहोत, त्यासाठी आम्ही तर तयार आहोत, पण तुम्ही तयार आहात का? असं विचारलं होतं. तर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला त्यांनी ”ती चिडचिडी तर तो एकदम शांत की याच्या अगदी उलट आहे सगळं,” असं कॅप्शन देण्यात आलं होतं. पुढे या व्हिडीओमध्ये राशा व अभय यांचा ‘लाईके लाईका’ हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन सौरभ गुप्ता करणार आहेत. नवीन चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी व्हिडीओखाली कमेंट करत या फ्रेश जोडीला पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
‘लाईके लाईका’ या आगामी चित्रपटातून राशा व अभय पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ‘मुंज्या’ व ‘आझाद’ या त्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात उत्तम काम करत प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता हे दोघे ‘लाईके लाईका’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. अभय वर्माने ‘मुंज्या’मध्ये केलेल्या कामासाठी अनेकांनी त्याचं कौतुक केलं. या चित्रपटातून तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला होता, त्यामुळे आता त्याच्या नवीन चित्रपटात तो कोणत्या भूमिकेत दिसणार, तसेच राशा व त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल याची त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुक्ता आहे.