Rashmika Mandanna Qualification : मनोरंजन विश्वात अनेक कलाकार असे आहेत जे उच्चशिक्षित आहेत किंवा ते शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व असलेल्या कुटुंबातून येतात. परंतु, काही ओघाओघाने या क्षेत्रात आले, तर काहींनी ठरवून हा मार्ग निवडला. उच्च शिक्षण असतनाही ते सोडून मनोरंजन विश्वात आपला छंद जोपासत असलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे रश्मिका मंदाना.

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. तिनं दाक्षिणात्य चित्रपटांत काम करत इंडस्ट्रीत स्व;ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर बॉलीवूड चित्रपटांतही मुख्य नायिकेच्या भूमिका साकारल्या आणि अनेक हिट चित्रपट दिले. ‘छावा’ हा तिचा बॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपट ठरला. यापूर्वी आणि त्यानंतरसुद्धा तिनं काही हिंदी चित्रपटांत काम केलं; परंतु ‘छावा’मधून तिनं हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकली.

रश्मिकानं दाक्षिणात्य व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांसह स्क्रीन शेअर केली आहे. तिनं सलमान खान, विकी कौशल, विजय देवरकोंडा, अमिताभ बच्चन, दुलकर सलमान यांसारख्या अनेक अभिनेत्यांसह काम केलं आहे. अभिनयाचा वारसा नसलेल्या रश्मिकानं तिच्या सहजसुंदर अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आज ती देशातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, रश्मिकानं अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि तिच्याकडे काही पदव्यासुद्धा आहेत. रश्मिकाचं शिक्षण किती आहे आणि तिनं कोणत्यात विषयात पदवी मिळवली आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

Award Banner

फार कमी लोकांना माहीत आहे का की, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी रश्मिका मंदानानं शिक्षणावर विशेष भर दिला होता. तिनं बेंगळुरूत मानसशास्त्र, पत्रकारिता व इंग्रजी साहित्य यांचा अभ्यास केला. महाविद्यालयीन काळात तिनं मॉडेलिंग असाइनमेंट्स आणि सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला, ज्यामुळे तिच्या चित्रपट कारकिर्दीचा मार्ग मोकळा झाला.

रश्मिका मंदानानं २०१६ साली कन्नड चित्रपट ‘किरीक पार्टी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि ती अल्पावधीतच तरुण प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. या चित्रपटाच्या यशामुळे ती एक आशादायी नवोदित अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आणि विविध चित्रपटसृष्टींमध्ये तिच्यासाठी संधींची दारं उघडली. पडद्यावर भावनिक गहिरेपणा आणि उत्साही आकर्षण दोन्ही प्रभावीपणे साकारू शकते, हे तिनं सिद्ध केलं आहे.