बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि वेगवेगळे इवेंट हे समीकरण आपल्यासाठी नवीन नाही. विविध कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावलेली हजेरी आणि त्यांच्या हटके लूकचे फोटो व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत असतात. नुकतंच ‘स्टारडस्ट’ मॅगजीनच्या एका इवेंटमध्ये बऱ्याच बड्या कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री रेखा आणि रविना टंडन यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
रेखा आणि रविना या दोघींनी कार्यक्रमात हजेरी लावली आणि लोकांचं लक्ष वेधून घेतलं. रेखा ह्या नेहमीप्रमाणे सुंदर साडी परिधान करून आल्या होत्या तर रविना एका ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत होती. दोघींवर पत्रकारांच्या आणि फोटोग्राफर्सच्या नजरा खिळल्या होत्या. या दोघींना कॅमेरात कैद करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक होता. त्यांनीसुद्धा सगळ्यांना चांगली पोझ देत फोटो दिले.
आणखी वाचा : “पठाणचं प्रमोशन का केलं नाही?” चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख उत्तरला, “वाघ कधी…”
या व्हिडिओमध्ये रविना रेखा यांच्याशी अत्यंत आपुलकीने गप्पा मारताना दिसली. फोटो काढून झाल्यानंतर रविनाने रेखा यांच्यासह तिच्या मोबाईलमध्ये एक छानसा सेल्फीदेखील काढला. नंतर जाताना रेखा यांनी रविनाच्या गालावर कीसही केलं. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना या दोघींमध्ये एकेकाळी निर्माण झालेल्या वादाची आठवण झाली आणि त्यांनी ती आठवण उकरून काढली.
मीडिया रिपोर्टनुसार एक काळ असा होता जेव्हा या दोघींचं नाव खिलाडी कुमार अक्षय कुमारशी जोडलं गेलं होतं. रविनाबरोबर रिलेशनशीपमध्ये असताना अक्षय आणि रेखा यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचं तेव्हा चर्चेत होतं, रविनानेसुद्धा त्यावेळी एका मुलाखतीमध्ये यावर स्पष्टीकरणही दिलं होतं. यादरम्यान रविना आणि रेखा या दोघींमध्ये काहीतरी बेबनाव असल्याचीसुद्धा चर्चा होत होती. या दोघींचा हा नवा व्हिडिओ पाहून कित्येकांनी त्याच्या खाली कॉमेंटमध्ये ही आठवण काढली आहे. काहींनी तर थेट अक्षय कुमारशी संबंध जोडत याखाली कॉमेंट केल्या आहेत.