Raveena tandon Rejected Kuch Kuch Hota Hain : ‘कुछ कुछ होता है’ हा बॉलीवूडमधील लोकप्रिय चित्रपट आहे. करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी झळकले होते. पण, तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटात राणीने साकारलेल्या टीनाच्या भूमिकेसाठी आधी रवीना टंडनला विचारणा झालेली. परंतु, तिने ती भूमिका नाकारली होती.

‘कुछ कुछ होता है’ हा काजोल व शाहरुख खानचा लोकप्रिय चित्रपट आहे. त्यामध्ये राणी व सलमान खानही पाहुण्या कलाकारांच्या भूमिकांत पाहायला मिळतात. त्यांच्या भूमिका काजोल व शाहरुखच्या तुलनेत छोट्या असल्या तरी त्यांचे चित्रपटातील सीन व संवाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. परंतु, यामध्ये राणीच्या जागी रवीना टंडनला विचारणा झालेली. मात्र, करिअरच्या पीकवर असताना तिने या भूमिकेला नकार दिलेला. रवीनाने त्याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली आहे.

रवीना टंडन ९० च्या काळातील बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होती. इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह तिने काम केलं आहे. तिने अनेक चित्रपटांत मुख्य नायिका म्हणून काम केलं आहे. ‘मोहरा’ या चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि याच चित्रपटातून ती खऱ्या अर्थाने मुख्य नायिका म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे इंडस्ट्रीत मुख्य नायिका म्हणून ओळख मिळवल्यानतंर तिला पुन्हा दुय्यम भूमिका साकारायच्या नव्हत्या, याबद्दल तिने ‘झूम’शी संवाद साधताना सांगितलं आहे.

रवीना टंडन नेमकं काय म्हणाली?

रवीना टंडन म्हणाली, “काही चित्रपटांना नकार देण्यामागे काही कारणं होती. उदाहरणार्थ ‘कुछ कुछ होता है.’ करण मला नेहमी म्हणतो की, तू माझ्या पहिल्या चित्रपटाला नकार दिलास; पण मीसुद्धा त्याला नेहमी हेच सांगते की मला तुझ्यासोबत काम करायला आवडलं असतं, तू माझा चांगला मित्र आहेस, पण दुर्दैवाने त्यावेळी मी करिअरमध्ये अशा टप्प्यावर होते, जिथे मी दुय्यम भूमिका साकारून पुन्हा सगळं सुरू करू शकत नव्हते.”

त्याबद्दल रवीना पुढे म्हणाली, “माझ्यासाठी तसं करणं गरजेचं होतं. चित्रपटात फक्त पाच सीन आणि पाच गाणी असली असती तरी मी काम केलं असतं, पण त्यात मुख्य अभिनेत्रीची भूमिका असणं अनिवार्य़ होतं. मला त्याच पद्धतीने करिअरची सुरुवात करणं भाग होतं. माझ्यासाठी तो खूप कठीण निर्णय होता.”

रवीनाने पुढे तिने मणी रत्नम यांच्या ‘छय्या छय्या’ या गाण्यालाही नकार दिल्याचा खुसाला केला आहे. १९९८ साली आलेल्या ‘दिल से’ चित्रपटातील या गाण्याला नकार देण्यामागचं कारण सांगत रवीना म्हणाली, “छय्या छय्याची ऑफर आली आणि मी ते करण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. परंतु, मला आयटम गर्ल म्हणून ओळख मिळवायची नव्हती. मला आठवतंय, मी मणी रत्नम यांना सांगितलेलं की मी तुमच्या चित्रपटात काम करण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. मला तुमच्या प्रत्येक चित्रपटात काम करायचं आहे, पण दुर्दैवाने मी हे गाणं करू शकत नाही, अशा काही खंत करण्याजोग्या बाबी असतात. पण, तुम्हाला आयुष्यात सगळंच मिळू शकत नाही.”

रवीना टंडनने नकार दिल्यानंतर ‘छय्या छय्या’ या गाण्यामध्ये शाहरुख खानसह मलायका अरोरा झळकलेली. हे गाणं बॉलीवूडमधील लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. आजही एसआरकेचे चाहते या गाण्यावर थिरकताना दिसतात.