Raveena Tandon Talks About Dhurandhar : गेले दोन महिने ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. प्रेक्षकांसह कलाकारांनीही या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. अशातच आता बॉलीवूडची अभिनेत्री रवीना टंडन हिनेसुद्धा आदित्य धरचा ‘धुरंधर’ चित्रपट पाहिला आहे. नुकतेच तिने तिला ‘धुरंधर’ कसा वाटला याबद्दल सांगितलं आहे.

रवीना टंडनने यावेळी लोकांना ‘केजीएफ चॅप्टर २’, ‘पुष्पा’ अशा धाटणीचे चित्रपट आवडत आहेत आणि ‘धुरंधर’मुळे नायक नायकासारखा पाहायला मिळत असल्याचं म्हटलं आहे. ‘झूम’शी संवाद साधताना रवीना टंडनने याबद्दल सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर ती यामी गौतमला सॉरी म्हणाली आहे. रवीना यामीला नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

रवीना टंडन नेमकं काय म्हणाली?

‘धुरंधर’ पाहिल्यानंतर रवीना मुलाखतीत म्हणाली, “मी ‘धुरंधऱ’ पाहिला आणि यामीला फोन केला. म्हटलं, सॉरी. पण, मी तुझ्या नवऱ्याची खूप मोठी फॅन आहे आणि तुला हे त्याला सांगायचं आहे.” रवीनाने खूप उत्सुकतेने हे सांगितलं. यामधून तिने ‘धुरंधर’मधील तिला आदित्य धरचं दिग्दर्शन खूप आवडलं असं म्हटलं आहे.

आदित्य धरच्या दिग्दर्शनाचं कौतुक करत पुढे रवीना म्हणाली, “मला असं वाटतं की, आदित्य धरसारखे दिग्दर्शक हिंदी सिनेमामधून गायब झालेल्या गोष्टींची पुन्हा सुरुवात करत आहेत.” यावेळी तिने ‘केजीएफ चॅप्टर २’, ‘पुष्पा’ या चित्रपटांचा उल्लेख करत असे चित्रपट पुन्हा बनत असल्याने १९७० मधील लार्जर देन लाइप ही संकल्पना पुन्हा सुरू केल्याचं म्हटलं आहे. याबद्दल रवीना पुढे म्हणाली, “त्यांनी १९७० मधील पद्धत पुन्हा सुरू केली, ज्यामधून नायक नायकासारखा वाटत आहे.” यावेळी तिने फक्त स्क्रीनवर तुम्ही कसे दिसता याला महत्त्व न देता प्रेक्षकांना ते कसं वाटतं, यालाही तितकेच महत्त्व असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, रवीना टंडन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि इंडस्ट्रीतील तसेच तिच्या अवती-भोवती घडणार्‍या गोष्टींबद्दल तिच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असते.