Ravi Jadhav on Banjo Movie: रवी जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘बँजो’ या सिनेमाचेही दिग्दर्शन केले होते. मात्र बॉक्स ऑफिसवर तो सिनेमा चालला नाही.
रवी जाधव यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या युट्यूब चॅनेल ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बँजो सिनमाबद्दल भावना व्यक्त केल्या. रवी जाधव म्हणाले, “मी बँजो सिनेमा मराठीत करणार होतो. रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत होते. म्युझिक अजय अतुलचं होतं. मराठीत सिनेमा होता. त्याची संपूर्ण गोष्ट मराठी होती.”
“पण जेवढी अपेक्षा होती तेवढा…”
“जे मराठी वादक असतात, बँजो पथक असतं. त्यावर आधारित हा सिनेमा होता, जसा नटरंग तमाशावर आधारित होता. आताची बँजोपथकातील मुलं आहेत जी लालबागच्या राजाला, चिंतामणीच्या गणपतीला अजूनही बँजो वाजवतात. त्या मुलांच्या आयुष्यावरती ती गोष्ट होती. आम्ही त्या गोष्टीवर काम करत होतो करता करता ती गोष्ट हिंदी झाली. अजून थोडं मोठे करूया असं म्हणत ही गोष्ट हिंदी झाली. निर्माते हिंदी होते. त्यानंतर सिनेमा हिंदी झाला.”
“मग त्यानंतर अजय अतुल सिनेमातून बाहेर पडले. बाहेर पडले म्हणजे त्यांना वेळ नव्हता. ते असते तर ती गंमत आली असती. थोडक्यात त्यांनी जलवा केला असता. निर्मात्यांनी खूप पाठिंबा दिला. प्रचंड मोठ्या स्केलला सिनेमा बनला. रितेश देशमुख यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं. पण सिनेमा चालला नाही. अजूनही सण उत्सवाच्या वेळी चित्रपतील गाणी लागतात. लोक त्याच्यावर नाचतात. पण जेवढी अपेक्षा होती तेवढा सिनेमा चालला नाही.”
पुढे रवी जाधव म्हणाले, “या चित्रपटानंतर लोक म्हणू लागले की याला दिग्दर्शन जमत नाही. मी जर हा सिनेमा हिंदी म्हणून केला असता तर मुळात मी बँजो विषय घेतला नसता. एवढं साधं सोपं गणित आहे. मुळात त्या सिनेमाच संपूर्ण लिखाण मराठीत होतं. त्यातली जी पात्र होती ती मराठी होती. सायकलवाला मुलगा असेल किंवा चाळीतला नळावरील पाणी भरणारा मुलगा असो सगळी पात्रे मराठी होती. हे जग मी बिहार, अहमदाबाद, यूपी, हरियाणाच्या लोकांना कसे दाखवणार? ही गोष्ट महाराष्ट्रातली असल्याने इतर लोकांपर्यंत ती पोहोचली नाही, असं मला वाटतं. सिनेमाला अपयश आल्यानंतर काही अशा गोष्टी खूप ऐकायला मिळल्या की याला दिग्दर्शन जमत नाही.”
“या चित्रपटानंतर माझ वैयक्तिक नुकसान असं झालं की मला हिंदीत काम कमी मिळू लागलं. ‘नटरंग’पासून ‘टाईमपास २’ पर्यंत मला हिंदीतून खूप ऑफर्स येत होत्या. असा एकही निर्माता नाही की ज्याने मला बोलवलं नाही. बँजो नंतर अशा ऑफर्स येणे कमी झालं. माझं वैयक्तिकरित्या खूप नुकसान झालं”, असे म्हणत रवी जाधव यांनी वक्तव्य केले.
