अनेक कलाकार वजन घटवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. अनेक जण वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करत असतात. अनेकदा यासाठी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून त्यांना नियमीतपणे डाएट पाळावा लागतो शिवाय अनेकदा आवडत्या पदार्थांपासूनही दूर राहावं लागतं. अशातच आता अभिनेते राजकारणी रवी किशन यांनी वजन कसं घटवलं आणि आहारात कोणता बदल केला याबद्दल सांगितलं आहे.

अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांनी तब्बल १८ किलो वजन घटवल्याचं सांगितलं आहे. वजन कमी करण्यासाठी त्यांनी कोणताही शॉर्टकट न वापरता आहारात बदल आणि नियमित व्यायामाचा आधार घेतल्याचं स्पष्ट केलं. ५७ वर्षीय रवी किशन म्हणाले, “माझं वजन ९० किलो झालं होतं. आता ते ७२ किलोवर आणलं आहे. मी माझ्या शरीरावर मेहनत घेत आहे. मला फिट राहायचं आहे.” ते पुढे म्हणाले की, खासदार म्हणून राजकीय जबाबदाऱ्या आणि गोरखपूर मतदारसंघातील सततचे दौरे यामुळे त्यांचं वजन वाढलं होतं. मात्र, आता पुन्हा वजन नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी फळांचा अधिक समावेश असलेला आहार सुरू केला आहे.

रवी किशन यांनी कसं घटवलं १८ किलो वजन?

“मी खाण्याच्या सवयी बदलल्या आणि त्याचमुळे १८ किलो वजन कमी करण्यात यश आलं,” असंही रवी किशन यांनी सांगितलं. रवी किशन यांच्या बदलत्या पडद्यावरील भूमिकांमुळेही त्यांना वजन कमी करण्याची गरज भासली. ते म्हणाले, “लापता लेडीज (२०२४) चित्रपटासाठी मला जाड दिसायचं होतं. मिर्झापूर: द मूव्हीमध्ये मी सडपातळ दिसणार आहे, तर नागझिलामध्ये माझी फिट आणि दमदार बॉडी पाहायला मिळेल.”
ते पुढे म्हणाले, “वयाच्या पन्नाशीनंतर शरीरात असा बदल घडवणं सोपं नसतं. मात्र, योग्य आहार घेतल्यास ते शक्य होतं. फिटनेसपैकी ७० ते ८० टक्के वाटा हा आपण काय खातो यावर अवलंबून असतो, तर उर्वरित २० ते ३० टक्के व्यायामावर.”

रवी किशन यांनी स्पष्ट केलं की, ते कायम फक्त फळांचाच आहार घेत नाहीत. गरजेनुसार ते आपल्या आहारात बदल करत असतात. ते म्हणाले, “महादेवांच्या कृपेने मला दिवसातून एकदाच जेवण करण्याची, इंटरमिटंट फास्टिंग पाळण्याची किंवा काही दिवस फक्त फळांवर राहण्याची ताकद मिळते.” ते पुढे म्हणाले, “माझ्या राजकीय जबाबदाऱ्यांनुसार मी आहारात बदल करत असतो. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे मी भिजवलेला सुका मेवा आणि सॅलड खातो. गरजेनुसार प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि तुपाचाही आहारात समावेश करतो.”

रवी किशन यांच्या आहारात अॅव्होकॅडो, किवी, सफरचंद, केळी, संत्री आणि ताज्या फळांचा रस यांचा प्रामुख्याने समावेश असतो. आहाराबरोबर नियमित व्यायामही तितकाच महत्त्वाचा असल्याचं ते सांगतात. ते म्हणाले, “केवळ आहार पुरेसा नाही. स्नायू निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणंही तितकंच आवश्यक आहे.”

कामाबाबत बोलायचं झाल्यास, रवी किशन लवकरच ‘खोसला का घोसला २’ या चित्रपटात झळकणार आहेत. तसेच, ते लवकरच ओटीटीवरील लोकप्रिय मालिका ‘मामला लीगल है’च्या तिसऱ्या सीझनचं चित्रीकरणही सुरू करणार आहेत.