Raza Murad slams Bollywood stars for missing Mushtaq Khans funeral: अभिनेते मुश्ताक खान यांचं २४ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. आता ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी मुश्ताक खान यांच्या अंत्यसंस्काराला बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित न राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

रझा मुराद यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करीत आपली खंत व्यक्त केली. इंडस्ट्रीतील कलाकार उद्योगपतींच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू शकतात. तिथे वेटरप्रमाणे जेवण वाढू शकतात; मात्र मुश्ताक खान यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, असं त्यांनी म्हटलं.

“मुश्ताक खान यांना अखेरचा निरोप देण्यासाठी…”

रझा मुराद भावूक होत म्हणाले, “ज्यांना आपण स्टार म्हणतो, त्यापैकी एकही स्टार मुश्ताक खान यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आला नव्हता. त्यांचे अनेक सहकलाकार, सहकारी आले होते; पण कोणताही मोठा चेहरा आला नव्हता.”

कोणाचंही थेट नाव न घेता रझा मुराद पुढे म्हणाले, “जर एखाद्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न असतं, तर हेच लोक तिथे फक्त उपस्थितच राहिले नसते, तर लग्नातील पाहुण्यांना त्यांनी वेटरसारखं जेवणही वाढलं असतं किंवा एखाद्या राजकीय पक्षाला त्यांची गरज असती तरी ते नक्कीच तिथे उपस्थित राहिले असते; पण ज्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यातील ५० वर्षं म्हणजे जवळजवळ संपूर्ण आयुष्य फिल्म इंडस्ट्रीला दिलं, त्यांच्यासाठी तुम्ही ५० मिनिटंही देऊ शकला नाहीत.”

मुश्ताक खान यांच्या अंत्यसंस्काराला बॉलीवूडमधील मोठे चेहरे उपस्थित न राहिल्याबद्दल रझा मुराद यांनी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, “त्यांनी केवळ आपल्या कामाच्या जोरावर हे स्थान मिळवलं. त्यांच्या आयुष्यात त्यांना तुमची गरज नव्हती आणि मृत्यूनंतरही त्यांना तुमची गरज नाही. असा एकही स्टार नसेल, ज्याच्याबरोबर मुश्ताक खान यांनी काम केलं नसेल. तरीही त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी कोणी आलं नाही, याची खंत नक्कीच राहील.”

रझा मुराद असेही म्हणाले की, पैसे आणि प्रसिद्धी एक दिवस संपू शकते. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी मुश्ताक खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या प्रसंगी राजपाल यादव, अनीस बज्मी, जैद दरबार, संजय मिश्रा, मनीष वाधवा, शहजाद खान, रजत बेदी, अन्नू कपूर आणि सुलभा आर्या यांच्यासह त्यांचे अनेक सहकलाकार उपस्थित होते.