Nabil Gabol on Meeting Dawood Ibrahim: ‘धुरंधर’ व ‘धुरंधर’ २ मध्ये राकेश बेदी यांनी ‘जमील जमाली’ ही भूमिका साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. हे पात्र पाकिस्तानी राजकारणी नबील गबोल यांच्यावर आधारित असल्याचं म्हटलं जातंय. आता स्वतः नबील गबोल यांनी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात त्यांचे पात्र फरार गँगस्टर दाऊद इब्राहिमची भेट घेताना दाखवलं आहे.

धुरंधर चित्रपटात दाऊदला ‘बडे साहब’ असं संबोधलं आहे. तो अंथरुणाला खिळलेला असून पडद्यामागून सूत्र हलवतो, असं दाखवण्यात आलंय. जमील जमालीने दिलेल्या विषामुळे दाऊदची प्रकृती बिघडल्याचंही एका दृश्यात दाखवण्यात आलं आहे, कारण जमील जमाली प्रत्यक्षात एक भारतीय गुप्तहेर आहे.

दाऊदच्या भेटीबद्दल नबील गबोल काय म्हणाले?

एका मुलाखतीत नबील गबोल यांना दाऊद इब्राहिम कराचीत असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. “मुंबईतील एक शेजारी आपल्या कराचीत राहतात, त्यांना बडे साहब म्हणतात. तुम्ही कधी त्यांना भेटला आहात का?” गबोल यावर उत्तर देत म्हणाले, “मी त्यांना कधीही भेटलेलो नाही आणि ते कराचीत राहतात की नाही हे सुद्धा मला माहीत नाही. प्रसारमाध्यमे आणि ‘धुरंधर’ चित्रपटामध्ये असं दाखवलंय की ते कराचीच्या क्लिफ्टन भागात राहतात. तो भाग माझ्या घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर आहे. पण मी त्यांना कधीही कुठे पाहिलेलं नाही किंवा त्यांच्याबद्दल काही ऐकलेलं नाही.”

Award Banner

ते पुढे म्हणाले, “धुरंधरमध्ये असं दाखवलंय की, जमीलने दिलेल्या इंजेक्शनमुळे ते मरणासन्न अवस्थेत आहेत आणि मृत्यूच्या दारात उभे आहेत. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे की नाही, हे सुद्धा मला माहीत नाही.”

माझे पात्र योग्य पद्धतीने दाखवले नाही- नबील गबोल

डिसेंबर २०२५ मध्ये ‘धुरंधर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, नबील गबोल यांनी पडद्यावरील त्यांच्या पात्राबद्दल नाराजी व्यक्त केली होती. “माझी जी भूमिका दाखवण्यात आली आहे, ती प्रत्यक्षात खूप दबंग होती. पण त्यांनी माझे पात्र योग्य पद्धतीने दाखवले नाही. मी जसा होतो, तसं मला दाखवलं नाही,” असं पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना गबोल म्हणाले होते. या चित्रपटात कराचीतील ‘ल्यारी’ भाग जसा दाखवलाय, त्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला होता. “त्यांनी ल्यारीला दहशतवादाचे केंद्र म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण ल्यारी तसं नाही. जर त्यांचा एखादा एजंट तिथे आला असता, तर तो ल्यारीमधून जिवंत परत गेला नसता,” असं विधान त्यांनी केलं होतं.

दरम्यान, ‘धुरंधर’ फ्रँचायझीमध्ये जमीली जमाली हे पात्र सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. कराचीतील राजकारणी पण प्रत्यक्षात भारतीय गुप्तहेर असलेली ही भूमिका उत्तमरित्या वठवल्याबद्दल राकेश बेदी यांचं खूप कौतुक होत आहे.

धुरंधर २ च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १,०२८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे आणि जगभरात १३९३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.