South Indian Actress on working in Bollywood: ‘साकिनी डाकिनी’, उत्सवम, नेने ना अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत काम करत रेजिना कॅसेंड्राने तिची ओळख निर्माण केली आहे. तिने प्रामुख्याने तमीळ आणि तेलुगू चित्रपटांत काम केले आहे. मात्र, हिंदी सिनेमांत तिने कमी काम केले आहे. आता बॉलीवूडमध्ये तिने का जास्त काम केले नाही, याबद्दल तिने वक्तव्य केले आहे.
रेजिना कॅसेंड्राचा जन्म चेन्नईमध्ये झाला. तिचे शिक्षणही तेथेच पूर्ण झाले. तिने २००५ साली प्रदर्शित झालेल्या कंदा नाल मुधल या तमीळ चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर विविध चित्रपटांत भूमिका साकारत ती प्रसिद्धीझोतात आली.
“त्यांनी माझा अपमान केला…”
अभिनेत्रीने अनिल कपूर आणि सोनम कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याबरोबर अभिनेत्री ‘केसरी-चॅप्टर २’ व ‘जाट’ या बॉलीवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांत दिसली.
चित्रपटांबरोबरच तिने रॉकेट बॉईज व फर्जी या हिंदी वेब सीरिजमध्येदेखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम केले.
अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात काम न करण्याचे कारण सांगितले आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “अनेक लोकांनी मला अपमानास्पद वागणूक दिली. फक्त शब्दांनीच त्यांनी माझा अपमान केला असे नाही, तर त्यांच्या कृतीतूनही मला ते दिसले. मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला गेला, हे कोणीही सांगू शकत होतं. मला ते जाणवलं. त्यामुळे उत्तरेत काम करण्यासाठी माझ्यापुढे मर्यादा होत्या; पण हे सांगत असताना हेही खरं आहे की, असं प्रत्येक वेळी घडत नाही.”
त्याबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दल ती म्हणाली, “मी एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. बहुतेक दक्षिण भारतीयांच्या तुलनेत माझी हिंदी खूपच चांगली आहे. मी हिंदी वाचू, लिहू व बोलू शकते. आजवर मी हिंदी भाषेत जे काही काम केले आहे, ते माझ्याच आवाजात केले आहे. ती माझी स्वतःची हिंदी आहे आणि मला दिलेल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केला आहे.”
दरम्यान, आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकांमध्ये दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

