ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. लहान वयातच त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. किशोरवयात त्यांच्या आई त्यांना मुंबईत घेऊन आल्या. अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्या काळात रेखा संघर्ष करत होत्या आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या एका संधीच्या शोधात होत्या.

याच काळात त्यांची भेट त्या वेळचे आघाडीचे अभिनेते संजय खान यांच्याशी झाली. मात्र, सुरुवातीला संजय खान यांनी रेखा यांच्याबरोबर फोटोशूट करण्यास नकार दिला होता. नंतर त्यांच्या पत्नी झरीन खान यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच संजय खान यांनी रेखांबरोबर फोटोशूट करण्यास होकार दिला. विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत संजय खान यांची मुलगी फराह खान अली यांनी या आठवणीला उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, रेखा नुकत्याच त्यांच्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी हा जुना किस्साही सांगितला.

नेमकं काय घडलेलं?

फराह म्हणाल्या, “माझ्या वडिलांनीच रेखा यांना पहिली मोठी संधी दिली होती.” त्यानंतर त्यांनी रेखा यांनी सांगितलेला हा किस्सा पुन्हा सांगत त्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. फराह खान अली म्हणाल्या, “आईच्या निधनानंतर रेखा आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या, आज मी चित्रपटसृष्टीत आहे, त्याचं एकमेव कारण तुझी आई आहे.” फराह यांनी पुढे सांगितलं की, सुरुवातीला संजय खान यांनी रेखा यांच्याबरोबर फोटोशूट करण्यास नकार दिला होता, कारण त्या काळी त्यांना रेखा फार आकर्षक वाटत नव्हत्या.

फराह रेखाबद्दल म्हणाल्या, “रेखा म्हणालेल्या, मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले, तेव्हा माझं वजन जास्त होतं आणि मी फार आकर्षक दिसत नव्हते. त्यामुळे तुमच्या वडिलांना माझ्याबरोबर फोटोशूट करायचं नव्हतं. मात्र तुमची आई झरीन सतत त्यांना म्हणत होती, या मुलीकडे नीट बघा. तिचे डोळे किती सुंदर आहेत, तिचे ओठ किती छान आहेत. कृपया तिच्याबरोबर फोटोशूट करा. अखेर तुमच्या वडिलांनी फोटोशूटसाठी होकार दिला. फोटो तयार झाल्यानंतर त्यांनी ते पाहिले आणि म्हणाले, ठीक आहे, ही चांगली दिसते. आपण हिच्याबरोबर चित्रपट करू. अशा प्रकारे मला संधी मिळाली, असं रेखा यांनी मला सांगितलं”.

रेखा आणि संजय खान यांनी एकत्र काम केलेला चित्रपट म्हणजे १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हसीनों का देवता’. या चित्रपटात बिंदू आणि हेलन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘सावन भादों’ (१९७०) या हिंदी चित्रपटानंतर ‘हसीनों का देवता’ हा रेखा यांचा दुसरा हिंदी चित्रपट ठरला.