Ranjeet on Rekha: रेखा त्यांच्या काळात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेले सिनेमे गाजल्यानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळत होत्या. त्यांनी अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. अभिनेते रणजित यांनी एका मुलाखतीत रेखा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला होता.

“१० वर्षं कोणत्याही सिनेमात…”

विकी लालवाणीला दिलेल्या मुलाखतीत रणजित म्हणालेले, “मी जवळजवळ एक दशक म्हणजे १० वर्षं कोणत्याही सिनेमात काम केलं नाही. कारण- मी ज्या पद्धतीचं काम करत होतो, भूमिका साकारत होतो, त्याचा मला कंटाळा आला होता. त्यामुळे मी स्वत: सिनेमे बनविण्याचा निर्णय घेतला. इंडस्ट्रीतील इतर कलाकारांबरोबर माझे चांगले संबंध होते. पण, ते जेव्हा माझ्या सिनेमांत काम करत असत, तेव्हा मी त्यांना त्यांच्या कामाचे पैसे देताना ते पैसे घेण्यास संकोच करीत असत. पण, मी आग्रहानं ते पैसे त्यांना देत असे.”

रेखा (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
रेखा (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

रणजित पुढे म्हणालेले, “मी रेखालाही सांगितलं की, तू माझी मैत्रीण आहेस. पण, तू जर माझ्या सिनेमात काम करत असशील तर, तू तुझं मानधन किती घेशील ते सांग, मी तुला ते देईन. ठरल्याप्रमाणे मी तिला तिच्या कामाचं मानधन दिलं. नंतर मला समजलं की, त्या आणखी एका सिनेमात काम करत होत्या. त्या सिनेमासाठी रेखानं मी दिलेल्या मानधनापेक्षा पाच लाख रुपये कमी घेतले होते.”

ते असेही म्हणालेले, “मला माहीत होतं की, ती निर्मात्यांना तिच्या घराबाहेर रांगेत उभं करायची, ती त्यांना भेटतही नसे. जेव्हा सिनेमाची गोष्ट सांगण्यासाठी माझी संपूर्ण टीम तिच्या घरी गेली होती, तेव्हा तिनं त्यांना आत येऊ दिलं नाही. ती फक्त तिच्या मॅनेजरकडून निरोप घ्यायची. रेखा स्वत: कोणालाच भेटायची नाही.”

रेखा(फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

“त्यावेळी तिचे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर…”

रेखा यांनी संध्याकाळी शूटिंग करण्यास नकार दिला, त्यावेळी अडचणी आल्या, असेही रणजित म्हणाले होते. ते म्हणालेले, “जेव्हा तिला माझ्या सिनेमात काम करण्यासाठी मी तिला कास्ट केलं होतं. त्यावेळी ती दुसऱ्या एका सिनेमात काम करत होती. ती मला म्हणाली की, आपण दिवसा शूटिंग करू. रात्रीचंही शूटिंग आपण दिवसाच करू. त्यावेळी मी तिला सांगितलं की, हा सिनेमा मी स्वत:साठी बनवत आहे; तुझ्यासाठी नाही. मला जाणीव झाली की, रेखा इतर निर्मात्यांप्रमाणेच माझ्याशी वागू शकते. त्यावेळी मी तिला सांगितलं की, माझं पैसे परत कर. आम्ही या गोष्टी मैत्रीपूर्ण पद्धतीनंच केल्या.”

याबद्दल अधित माहिती देत रणजित म्हणालेले, “त्यावेळी तिचे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर चांगले संबंध नव्हते. नंतर काही काळानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. पण, मला चित्रपटाचं शूटिंग फार्महाऊसवर करायचं होतं, जे मुंबईच्या बाहेर होतं आणि रेखाला संध्याकाळी तिच्या मुंबईतल्या घरी परत जायचे असे. माझ्या चित्रपटातील गाण्यांचं शूटिंग संध्याकाळी करायचे होते. तिचा कोरिओग्राफरबरोबरसुद्धा वाद होता. तिचे खूप नखरे असायचे.”

रेखा व अमिताभ बच्चन (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
रेखा व अमिताभ बच्चन (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

रणजित व रेखा यांच्यात आजही चांगली मैत्री आहे. मात्र, व्यावसायिक मतभेद टाळण्यासाठी रणजित यांनी रेखा यांना कोणत्याही सिनेमात कास्ट केले नाही.