Rekha Biswajit Kissing Scene Controversy: १९६०च्या दशकापासून रेखा सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांचे अनेक सिनेमे हिट ठरले आहेत. आजही त्यांच्याबरोबर काम केलेले कलाकार त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात, त्यांचे किस्से सांगतात.

‘दो शिकारी’ सिनेमाच्या सेटवर काय घडलेलं?

यासिर उस्मान यांच्या रेखा: द अनटोल्ड स्टोरी (Rekha: The Untold Story)या पुस्तकात रेखा यांच्या बॉलीवूडमधील सुरुवातीच्या दिवसांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, ‘दो शिकारी’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता बिस्वजीत, दिग्दर्शक कुलजीत पाल आणि सिनेमॅटोग्राफर राजा नवाथे यांनी मिळून एक प्लॅन केला. कॅमेरा सुरू होताच बिस्वजीत यांनी रेखा यांच्या संमतीशिवाय त्यांच्या ओठांवर किस करायचं असं ठरवण्यात आलं होतं.

ठरल्याप्रमाणे कॅमेरा सुरू झाल्यानंतर बिस्वजीत यांनी रेखा यांना किस केलं. रेखा यांना हे अपेक्षित नव्हतं आणि अचानक घडलेल्या या घटनेनं त्यांना धक्का बसला. या घटनेनंतर रेखा यांना विश्वासघात झाल्याचे वाटले, त्या प्रचंड संतापल्या होत्या, असे बिस्वजीत यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणात त्यांची काहीही चूक नसल्याचं ते म्हणाले होते. बिस्वजीत म्हणालेले, “मी हे माझ्या आनंदासाठी केलं नव्हतं, तर चित्रपटासाठी ते महत्त्वाचं होतं. रेखा यांना विश्वासघात झाल्यासारखं वाटलं आणि त्या संतापल्या होत्या”, असे पुस्तकात लिहिले आहे.

या घटनेबाबत दिग्दर्शक कुलजीत पाल यांनी वेगळीच बाजू मांडली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, रेखा यांना त्या सीनची आधीच कल्पना दिली होती आणि त्यांनी त्याची संमतीही दिली होती. कुलजीत पाल म्हणाले होते की, रेखा तिथे उपस्थित होत्या. त्या सीनबाबत त्यांना कोणतीही हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सहसा असे सीन करत नाहीत, त्यामुळे हा सीन आवडला नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगावं असं मी त्यांना सुचवलं होतं. या सीनबाबत त्यांना आधीपासूनच माहिती होती.

दरम्यान, रेखा सध्या सिनेमात दिसत नसल्या तरी विविध कार्यक्रमांना त्या हजेरी लावतात; त्यावेळचा त्यांचा उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेतो.