Rekha revealed why she wears sindoor : रेखा या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ९०च्या काळात अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणाऱ्या रेखा आजही मनोरंजनविश्वातील अनेकांच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. अजूनही त्यांची क्रेझ कायम आहे. रेखा या सतत कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात.
रेखा या आजवर अनेकदा कधी त्यांच्या व्यावसायिक तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नात्यामुळे तर आजही त्यांच्याबद्दल बोललं जातं. शिवाय त्यांचं लग्न, पती याबद्दलही बोललं गेलं. रेखा यांच्याबद्दलची अजून एक गोष्ट म्हणजे पतीच्या निधनानंतरही त्या नेहमीच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कुंकू लावलेल्या दिसतात. कुंकू विवाहित हिंदू महिला लावतात. असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक चाहत्यांच्या मनात नेहमीच प्रश्न निर्माण होतो की रेखा आजही कुंकू का भरतात या निर्णयामागचं कारण आणि त्या आजही ३६ वर्षांनंतरही हे का पाळतात, याबद्दल अनेक चर्चा आणि तर्कवितर्क असल्याचं दिसतं.
हिंदू परंपरेत कुंकू जे भांगेत लावलं जातं. विवाहित स्त्रिया कुंकू भरतात. ही गोष्ट अनेक हिंदू घरांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विवाह समारंभातही कुंकू साधारणपणे वराकडून वधूला लावलं जातं, आणि ते वैवाहिक नात्याचं प्रतीक मानलं जातं.
लग्नाच्या सात महिन्यानंतरच झालं पतीचं निधन
रेखा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, माध्यमांच्या वृत्तानुसार त्या दिल्लीतील उद्योजक आणि टीव्ही निर्माते मुकेश अग्रवाल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या होत्या. दोघांनी १९९० मध्ये लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांतच मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली, तेव्हा रेखा लंडनमध्ये होत्या.
‘या’ कारणामुळे रेखा लावतात कुंकू
न्यूज १८च्या वृत्तानुसार रेखा यांनी १९८२ मध्ये ‘उमराव जान’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. त्या वेळी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी त्यांना विचारले होते, “तुमच्या भांगेत कुंकू आहे का?” रेखा यावर म्हणालेल्या, “मी ज्या शहरातून येते, तिथे कुंकू लावणे फॅशन आहे.” रेखा यांचं हे उत्तर त्या वेळी चर्चेत आलं होते, कारण कुंकू सामान्यतः वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जाते, पण रेखा यांनी ते फॅशन किंवा वैयक्तिक शैलीचा भाग असल्याचं म्हटलं होतं.
