NEET UG 2026 Exam Cancelled : चित्रपटांना अनेकदा समाजाचा आरसा मानलं जातं. समाजात घडणाऱ्या आणि घडलेल्या अनेक गोष्टींवर आतापर्यंत चित्रपट बनवले गेले आहेत. त्यामुळे मंगळवारी नीट यूजी २०२६ (NEET UG 2026) परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरातून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसह अनेक जण संताप व्यक्त करत या निर्णयाचा विरोध करत आहेत. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये या विषयावर एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यामध्ये अशाच गोष्टीवर भाष्य करण्यात आलेलं.
या चित्रपटात लोकप्रिय मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेसुद्धा झळकला होता. अश्विनी चौधरी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट नेमका कोणता आहे, त्याचं नाव, कथा याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
कुठे पाहायचा?
अश्विनी चौधरी दिग्दर्शित ‘सेटर्स’ या चित्रपटात श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, इशिता दत्ता आणि सोनाली सैगल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट वाराणसी, जयपूर, मुंबई आणि दिल्लीमध्ये चालणाऱ्या पेपरफुटी आणि शैक्षणिक घोटाळ्यांवर आधारित होता. हा चित्रपट तुम्ही झी ५वर पाहू शकता.
चित्रपटात अपूर्वा (श्रेयस तळपदे) आणि त्याची टोळी परीक्षा पेपर लीक करून पैसे कमावताना दाखवली आहे. मात्र, आदित्य सिंह (आफताब शिवदासानी) नावाच्या पोलिस अधिकाऱ्याला त्यांच्यावर संशय येऊ लागल्यानंतर कथेला वेगळं वळण मिळतं.
‘सेटर्स’ बॉक्स ऑफिसवर का फ्लॉप ठरला?
‘सेटर्स’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांनी चित्रपटाच्या कमकुवत कथानकावर टीका केली आणि चांगलं लेखन असतं तर चित्रपट अधिक रंजक झाला असता, असं मत व्यक्त केलं. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट मोठ्या प्रमाणात अपयशी ठरला. रिपोर्टनुसार, सुमारे ११ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ८४ लाख रुपयांची कमाई केली होती.
NEET परीक्षा रद्द होण्यामागचं कारण
पेपरफुटीच्या संशयामुळे NEET UG 2026 परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ३ मे रोजी घेण्यात आली होती आणि देशभरातून सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. या प्रकरणामुळे देशातील परीक्षा सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत तर काही जाणकार मंडळी याबद्दल संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
