Remo Dsouza Home Tour: बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुझा सध्या त्याच्या आलिशान घरामुळे चर्चेत आला आहे. मुंबईतील त्याच्या ‘सब्र’ (Sabr) या बंगल्यात रेमो आणि त्याची पत्नी लिझेल अत्यंत सुखी आयुष्य जगत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या घराचे दरवाजे चाहत्यांसाठी उघडले. या घरात केवळ ११ पाळीव प्राणीच नाहीत, तर सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवणारी मंदिरेही आहेत. विशेष म्हणजे, रेमोने यावेळी आपल्या धर्मांतराबद्दल पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला असून, आपण लग्नाआधीच वयाच्या १५ व्या वर्षी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला, याचा रंजक किस्सा शेअर केला आहे.

रेमो व लिझेलच्या घरात राहतात ११ प्राणी

रेमो व लिझेल यांनी प्राण्यांबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. रेमो म्हणाला, “आमच्याकडे ८ कुत्रे आणि ३ मांजरी आहेत. आईस, स्नो, कोको, होप, रिक्को, कुंडी, स्टार आणि फ्युरी अशी कुत्र्यांची नावं आहेत. तर बाम्बी, झी झी आणि सिंबा अशी मांजरींची नावं आहेत. हे सर्व प्राणी पूर्ण घरात फिरत असतात.” मुलाखत घेणाऱ्या काम्याने घराबाहेर ‘मदर मेरी’ची मूर्ती आणि घरातील मंदिराबद्दल विचारलं, तेव्हा लिझेल म्हणाली, “माझा जन्म कॅथोलिक कुटुंबात झाला आहे आणि रेमो हिंदू कुटुंबातील आहे. माझं शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झालंय, त्यामुळे मी सर्व धर्मांच्या लोकांमध्ये राहिले आहे. मी सर्व धर्म समभाव पाळते, त्यामुळे हे सर्व आमच्या आयुष्याचा भाग आहे.”

लिझेलमुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही – रेमो डिसुझा

रेमोने धर्मांतराबाबतची एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, “लोकांना वाटतं की मी लिझेलमुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारला, पण तसं नाही. मुंबईत येण्यापूर्वी मी गुजरात मधील जामनगरमध्ये होतो आणि तिथेच माझं धर्मांतर झालं. मी चर्चसाठी खूप काम करायचो, त्यांच्यासाठी चॅरिटी शो करायचो. एका दिवशी तिथल्या फादरनी मला धर्मांतराबद्दल विचारलं आणि मी होकार दिला. हे सर्व लग्नाच्या खूप आधी झालं होतं. त्यावेळी मी १५ वर्षांचा होतो. माझ्या वडिलांनीही मला पाठिंबा दिला, फक्त त्यांनी त्यांचं नाव व आडनाव मी बदलू नये असं सांगितलं. माझं आधीचं नाव रमेश गोपी नायर होतं.”

remo-dsouza-home-sabr-shiva-temple-lizelle
रेमो डिसुझाचे घर (फोटो- कर्ली टेल्स)

रेमोच्या घरात दोन मंदिरं, रोज सकाळी करतो पूजा

त्यानंतर रेमो व लिझेलने त्यांच्या सुंदर घराची झलक दाखवली. त्यांच्या घरात गणपती आणि महादेवाची दोन मंदिरे आहेत. घरात प्रवेश करताच गणपतीची एक सुंदर मूर्ती आहे. “हा गणपती गेल्या १५ वर्षांपासून आमच्याबरोबर आहे. मी सकाळी उठल्यावर दोन्ही मंदिरात पूजा करतो, त्यानंतर माझ्या कुत्र्यांबरोबर आणि पक्ष्यांबरोबर वेळ घालवतो आणि मग जिममध्ये जातो,” असं रेमो म्हणाला. रेमोला जास्त गडद रंग आवडत नसल्यामुळे घराचे इंटिरिअर सौम्य ठेवले आहे.

घराआधी मंदिर बांधलं

रेमोने घराबाहेर असलेल्या शिव मंदिरात सर्वांना नेलं. हे मंदिर राखाडी संगमरवरी दगडाने बनवलेलं असून तिथे एक कारंजे देखील आहे. भगवान शिव आणि गणपतीबद्दलच्या ओढीबद्दल लिझेल म्हणाली, “जुने घर पाडण्यापूर्वी कोणीतरी सांगितलं की ही ईशान्य दिशा आहे, तेव्हाच मी ठरवलं की माझं शिव मंदिर याच ठिकाणी असेल. घराचे बाकी डिझाइन नंतर झाले, पण हे मंदिर सर्वात आधी तयार झाले. मी गेल्या २५ वर्षांपासून गणपती बसवतेय. मला माहित नाही का, पण मला गणपतीबद्दल खूप आपुलकी वाटते. मी दर शनिवारी मंदिरात जाऊन अभिषेक करायचे.”

remo-dsouza-home-sabr-shiva-temple-lizelle(1)
रेमो डिसुझाच्या घरातील मंदिरे (फोटो सौजन्य: सोशल मीडिया/कर्ली टेल्स)

लिझेल पुढे म्हणाली, “जेव्हा आपण मंदिरात जातो, तेव्हा आपल्या मागे १० लोक उभे असतात. आपण अभिषेक करत असतानाच दुसरं कोणीतरी येतं आणि सगळं घाईत उरकलं जातं, त्यामुळे मी खूप अस्वस्थ व्हायचे. जेव्हा मी या घरात पहिल्यांदा अभिषेक केला, तेव्हा मी रेमोला म्हटलं की, मला कुठेतरी असं वाटतंय की महादेवांनाच इथे यायचं होतं. घराचं काम सुरू असताना इथे खूप झाडं होती, मला अचानक फोन आला की तिथे साप आहे. जिथे आता हे कारंजे आहे, अगदी तिथेच तो साप होता. मी सर्पमित्रांना बोलावले, पण तोपर्यंत तो साप तिथून गायब झाला होता.”

रेमोने शिव मंदिरात ठेवलेले जगातील सर्वात लहान शिवलिंग दाखवले. हे शिवलिंग दुर्मिळ आहे, असं लिझेलने सांगितलं. रेमो डिसुझा व लिझेल यांनी १९९९ मध्ये लग्न केलं. ते जवळपास ३ दशकांपासून एकत्र आहेत. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतींसह एकूण तीनवेळा लग्न केले आहे. या जोडप्याला ध्रुव आणि गॅब्रिएल ही दोन मुलं आहेत.