Remo D’Souza Talks About Converting To Christianity : इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत, ज्यांचा अध्यात्मावर खूप विश्वास आहे आणि ते सर्व संस्कृती, धर्माचा आदर करतात. तर काही कलाकार असेही आहेत, ज्यांनी धर्म परिवर्तन केले आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे बॉलीवूडमधील लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझा.
रेमो डिसोझा बॉलीवूडमधील लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक असून, त्याने ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’, ‘स्ट्रीट डान्सर’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. रेमोनं अशातच त्याच्या पत्नीबरोबर ‘ज्ञानदीप रक्षीतला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यानं व त्याच्या पत्नीनं त्यांच्या नवीन घराची झलक तर दाखवलीच आहे. त्यांच्या घरात अनेक ठिकाणी विविध देवांच्या मूर्ती आहेत. त्यांनी यावेळी त्यांचा आध्यात्मिक प्रवास आणि रेमो डिसोझानं केलेलं धर्मांतर याबद्दलची माहिती दिली आहे.
रेमो डिसोझाच्या वडिलांनी ठेवलेली ‘ही’ अट
रेमो डिसोझा मुलाखतीत म्हणाला, “मी हिंदू म्हणून जन्मलो; पण नंतर कॅथलिक धर्म स्वीकारला.” पुढे त्याला जेव्हा तू धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुला तुझ्या घरातून विरोध झाला नाही का, असा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, “नाही. मी फक्त माझ्या आई-वडिलांना सांगितलं की, मी चर्चसाठी इतकं काही करत असतो. त्यामुळे मी विचार करत आहे की, मी कॅथलिक धर्म स्वीकारतो. माझे वडील म्हणाले ठीक आहे कर. फक्त माझं नाव बदलू नको. म्हणून माझं नाव रेमो गोपी डिसोझा आहे.”
मुलाखतीत पुढे अध्यात्म तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि आजच्या काळात धर्माबद्दल खूप बोललं जातं; पण आपल्याला तर हेच शिकवलं जातं की, प्रत्येक धर्माचा आदर करा, असं विचारल्यानंतर रेमो डिसोझाच्या पत्नी लिजेल डिसोझा म्हणाल्या, “माझ्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. रेमोसाठीसुद्धा. माझा जन्म कॅथलिक घरात झाला आणि त्याचा हिंदू घरात; पण पुढे त्यानं कॅथलिक धर्म स्वीकारला. मी कट्टर कॅथलिक आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये कदाचित माझ्या आई-वडिलांचं निधन झाल्यानं हा बदल झाला असावा की माझ्याकडे खूप वर्षांपासून गणपतीची मूर्ती असायची. त्यामुळे मी अचानक हिंदुत्वाकडे वळले. मी पूजा-पाठही करते आणि मला ते करायला आवडतं. त्यामुळे मी कॅथलिक म्हणून जरी जन्म घेतला असला तरी मी इतर धर्मांचाही आदर करते.”
रेमो पुढे म्हणाला, “माझंही तेच आहे. हिंदू घरात जन्म झाला; पण ,सर्व धर्मांचा, देवांचा आदर करतो. म्हणूनच माझ्या घरात ते तुम्हाला पाहयला मिळेल.” रेमो डिसोझाचं पूर्वीचं नाव रमेश गोपी नायर, असं आहे; पण धर्मांतर केल्यानंतर त्यानं हे नाव बदलून रेमो गोपी डिसोझा, असं केलं.
